Headlines

अभिजीत दीपकेंनी रिपब्लिकन पक्षात यावे:केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची थेट ऑफर, पेपरफुटीविरोधातील लढ्याचे केले कौतुक




नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीविरोधात आवाज उठवत स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणारे अभिजीत दीपके यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. “अभिजीत दीपकेंनी आता रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे. रिपब्लिकन पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खरा पक्ष आहे,” असे आठवले यांनी स्पष्टपणे म्हटले. चिपळूण येथे पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाची भूमिका, आगामी निवडणुकांमधील पक्षाची रणनीती, दलित तरुणांसाठी सरकारी योजनांचा वापर, कोकणातील रोजगार आणि पर्यटन तसेच अभिजीत दीपके यांच्या राजकीय वाटचालीवर भाष्य केले. अभिजीत दीपके यांच्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने नीट परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचवला. पेपरफुटीविरोधातील या लढ्याचा परिणाम घराघरापर्यंत पोहोचला, असे आठवले यांनी सांगितले. त्यामुळे दीपके यांनी रिपब्लिकन पक्षात यावे, असे आवाहन त्यांनी केले. रिपब्लिकन पक्षात सर्व जाती-धर्माच्या लोकांना स्थान रिपब्लिकन पक्ष हा केवळ एका समाजापुरता मर्यादित पक्ष नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर आधारित पक्ष असल्याचे आठवले म्हणाले. “सर्व जाती-धर्माच्या लोकांना पक्षात आणले पाहिजे. केवळ दलितांच्या मतांवर निवडणूक जिंकणे शक्य नाही. त्यामुळे नॉन-दलित समाजालाही सोबत घेतले पाहिजे,” अशी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती, असे आठवले यांनी सांगितले. गरीब, शेतकरी, युवक, महिला, बेरोजगार तसेच विविध जाती-धर्मातील नागरिकांनी रिपब्लिकन पक्षाशी जोडले गेले पाहिजे, अशी पक्षाची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसविरोधात एकच मजबूत पक्ष असावा, ही बाबासाहेबांची कल्पना रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेमागील बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची माहिती देताना आठवले म्हणाले की, काँग्रेसच्या विरोधात एक मजबूत राजकीय पर्याय असावा, अशी बाबासाहेबांची इच्छा होती. देशात सत्ताधारी पक्ष आणि त्याला प्रभावीपणे विरोध करणारा एक पक्ष अशी राजकीय व्यवस्था असावी, अशी त्यांची कल्पना होती. त्यासाठी त्यांनी विविध नेत्यांशी पत्रव्यवहारही केला होता. मात्र, त्यांच्या हयातीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना होऊ शकली नाही, असे आठवले यांनी सांगितले. चार राज्यांत निवडणूक लढवणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आगामी काळात चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडक जागा लढवणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये पक्षाचे संघटन असून, या राज्यांमध्ये आरपीआय काही जागा लढवणार आहे. उर्वरित जागांवर भाजपला पाठिंबा देण्याची पक्षाची भूमिका असेल, असे त्यांनी सांगितले. या चारही राज्यांमध्ये एनडीएला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले. दोन राज्यांत मान्यता मिळाली तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो रिपब्लिकन पक्षाला सध्या नागालँड आणि मणिपूरमध्ये मान्यता असल्याचे आठवले यांनी सांगितले. आणखी दोन राज्यांमध्ये पक्षाला मान्यता मिळाल्यास राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याच्या दिशेने मोठी प्रगती होईल, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रातही पक्षाला पुन्हा राजकीय मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन-तीन जागा लढवण्याची मागणी पक्ष करणार असून, त्यापैकी दोन जागा जिंकल्या तर पक्षाच्या राजकीय स्थितीला मोठे बळ मिळेल, असे आठवले म्हणाले. अभिजीत दीपके यांनी रिपब्लिकन पक्षात यावे अभिजीत दीपके यांच्या राजकीय वाटचालीबाबत बोलताना आठवले यांनी त्यांना थेट पक्षप्रवेशाची ऑफर दिली. दीपके हे यापूर्वी विविध सामाजिक आणि राजकीय आंदोलनांशी जोडले गेले होते. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या काळातही ते सक्रिय होते, असे आठवले यांनी नमूद केले. अरविंद केजरीवाल यांच्या टीमसोबतही दीपके यांनी काम केले असल्याचा उल्लेख त्यांनी केला. मात्र, दीपके यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर नीट पेपरफुटीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचल्याचे आठवले यांनी मान्य केले. “रोज एखादा पक्ष काढण्यात उपयोग नाही. पण अभिजीत दीपके यांनी पक्ष काढल्यामुळे नीट परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर घराघरात पोहोचला. पेपर लीक होणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे आता त्यांनी रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे,” असे आठवले म्हणाले. दलित तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग उभे करावेत रामदास आठवले यांनी दलित तरुणांना सरकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. “सगळ्यांनी नोकरी शोधण्यापेक्षा स्वतःचे उद्योग उभे केले पाहिजेत. स्वतःच्या पायावर उभे राहून इतर 20, 50, 100 किंवा 200 लोकांना रोजगार कसा देता येईल, याचा विचार केला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला. मत्स्य व्यवसायासह विविध क्षेत्रांतील योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कोकणातील तरुणांना कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे कोकणातील तरुणांना रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतर करावे लागू नये, यासाठी कोकणात छोटे-मोठे उद्योग उभे राहण्याची गरज असल्याचे आठवले यांनी सांगितले. कोकण हा निसर्गसौंदर्याने समृद्ध प्रदेश असून पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने अद्याप विकसित न झालेल्या ठिकाणांचा शोध घेऊन त्यांचा विकास करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. कोकणातील तरुणांनी उद्योग आणि व्यवसायाकडे वळावे, अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायद्याचा दावा पेपरफुटीच्या घटनांवर बोलताना आठवले यांनी सरकारने कठोर कायदा केल्याचे सांगितले. पेपरफुटी किंवा परीक्षेतील गैरप्रकार करणाऱ्यांना शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. कायदा असतानाही काही जण तो मोडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे केवळ कायदा करून न थांबता पेपरफुटी रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती आवश्यक असल्याचे आठवले यांनी सांगितले. परीक्षा घेणाऱ्या संस्था, स्थानिक प्रशासन आणि समाजातील विविध घटकांनीही पेपरफुटीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे अभिजीत दीपके यांच्या पेपरफुटीविरोधातील भूमिकेचे कौतुक करतानाच रामदास आठवले यांनी त्यांना थेट आपल्या पक्षात येण्याचे आवाहन केल्याने त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दीपके या ऑफरला काय प्रतिसाद देतात, याकडे आता लक्ष लागले आहे. हेही वाचा… भाजपचे 80 नगरसेवक टाकता येतील एवढे मोठे खड्डे!:नाशिकच्या दुर्दशेवरून संजय राऊतांचे सरकारला सवाल- नाशिक हे चंद्रावरचे शहर आहे का? नाशिक शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि खड्ड्यांमध्ये पडून झालेल्या मृत्यूंच्या सत्रावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली आहे. “नाशिक शहरात प्रशासनाने लोकांना रस्त्यावरच ‘स्विमिंग पूल’ निर्माण करून दिले आहेत. मी असे काही खड्डे पाहिलेत, ज्यात भाजपचे 80 नगरसेवक आणि शिंदे गटाचे आमदार एकत्र टाकता येतील,” असा शेलक्या शब्दांतील टोला राऊत यांनी लगावला. नाशिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी मखमलाबादसह इतर भागांतील रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी खड्ड्यांच्या प्रश्नावरून आणि कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचारावरून सरकारवर हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *