Headlines

तारापूर एमआयडीसी पुन्हा हादरली!:विराज प्रोफाइल्स कंपनीत सलग 3 स्फोट; 3 कामगार जखमी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर




तारापूर एमआयडीसीमधील औद्योगिक सुरक्षेचा बोजवारा पुन्हा एकदा समोर आला आहे. येथील ‘विराज प्रोफाइल्स’ या नामांकित स्टील कंपनीत आज (सोमवारी) सकाळी एकापाठोपाठ एक असे तीन भीषण स्फोट झाले. या लागोपाठ झालेल्या धमाक्यांमुळे संपूर्ण बोईसर परिसर हादरून गेला असून, कामगारांसह स्थानिक रहिवाशांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीमध्ये शंभर ते दीडशे कामगार काम करत होते. या स्फोटात तीन कामगार जखमी झाल्याचे समजते. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जखमीचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतेय. विराज प्रोफाइल्सच्या ‘एसएमएस वन’ (SMS 1) या प्लांटमध्ये स्क्रॅप (भंगार) वितळवून स्टील बनवण्याचे काम चालते. आज सकाळी पहिल्या शिफ्टचे काम सुरू झाल्यानंतर काही वेळातच येथील मुख्य फॅर्नेस टँकमध्ये (भट्टी) अचानक हा स्फोट झाला. अपघात झाला तेव्हा कारखान्यात अंदाजे 100 ते 150 कामगार प्रत्यक्ष काम करत होते. स्फोट इतका तीव्र होता की कारखान्याची लोखंडी छपरे (पत्रे) उडून दूर पडली, तर सुरक्षारक्षकांच्या केबिनच्या काचांचे तुकडे-तुकडे झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 3 कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. स्फोटाची भीषणता पाहता जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये लागणाऱ्या आगी आणि होणारे स्फोट सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आजच्या या घटनेमुळे एमआयडीसी प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि कारखान्यांमधील सुरक्षा यंत्रणांच्या त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत. रोज पोटापाण्यासाठी कारखान्यात येणाऱ्या हजारो कामगारांच्या जिवाशी चाललेला हा खेळ कधी थांबणार, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *