![]()
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिकेवर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकमधील ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली असून, जनतेचा रोष व्यक्त करणारा हा मोर्चा आता थेट महानगरपालिकेवर धडकला आहे. नाशिकच्या शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून महानगरपालिकेपर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून महापालिका प्रशासनावर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान खड्ड्यांमुळे बळी गेलेल्या सात नागरिकांचे फोटो लावून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, एका शिवसैनिकाने यमराजाचा वेश धारण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नागरिकांच्या मृत्यूला आपण (यमराज) नव्हे, तर महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा संदेश देत प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी या मोर्चात मांडली. या मोर्चात संजय राऊत यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले, सत्तेत नसलो तरी लोकांसाठी आम्ही रस्त्यावर उतरतो. माझ्यासमोर 10 नावे आहेत, ज्यांनी या खड्ड्यांमध्ये जीव गमावला. प्रवीण गायकवाड, उज्ज्वला शांताराम गायकवाड, प्रभाकर साहेबराव निकम, दिपली दिलीप बेळे, नीलेश प्रल्हाद खोतकर, जितेंद्र सिंह, दिलीप दामोदर काळे आणि कालच एका मुलांचे या खड्ड्यामुळे निधन झाले आहे, त्याचे नाव आहे अनुप भदाणे. मृतांच्या कुटुंबाला 1 कोटी दिले पाहिजे पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, हे या समोरच्यांनी केलेले खून आहेत, मर्डर, 302. या आयुक्ताला, इथल्या कुंभमेळ्याच्या मंत्र्याला 302 जोपर्यंत दाखल होत नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. 10-12 बळी घेता आणि हसत हसत सांगता 5 लाख रुपये कुटुंबाला दिले. हे 5 लाख तुमच्याकडे ठेवा, मृतांच्या कुटुंबाला 1 कोटी दिले पाहिजे, जे जखमी आहेत त्यांना 50 लाख दिले पाहिजेत, अशी मागणी राऊत यांनी केली. फक्त नाशिकसाठी डांबर संपले का? संजय राऊत म्हणाले, 35 हजार कोटी कुंभमेळासाठी, पण ते गेले कोणाच्या घशात? आमच्या पोरांचे बळी खड्ड्यात जात आहेत. रस्त्यावर स्विमिंग पूल आहे. एक मोठा खड्डा मला दिसला आणि म्हटलं की या खड्ड्यात भाजपचे सगळे नगरसेवक टाकायचे, दूसरा एक खड्डा दिसला म्हटलं यात मिंधे गटाचे नगरसेवक टाकायचे. ते 50 खोके वाले, तुम्हाला मृतांना 5 लाख. देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, डांबर संपलं आहे, इराणच्या युद्धामुळे डांबर संपले. त्याचे सैनिक गेले होते लढायला? संपूर्ण जगाला डांबर मिळत आहे आणि नाशिकसाठी डांबर संपले? गिरीश महाजन यांच्यावर टीका जिथे जिथे खड्डे आहेत, त्या त्या भागातल्या भाजपच्या आणि शिंदे गटाच्या नेत्याच्या, नगरसेवकाच्या घरावर मोर्चे काढू. हा रेडा तुमच्या घरात घुसवू, शिवसेनेच्या नादाला लागू नका. आम्ही सत्तेत नसू, पण रस्त्यावर आहोत. मघाशी मी म्हणालो, सत्तेपेक्षा डेंजर आम्ही रस्त्यावर आहोत. शिवसेनेचा जन्म रस्त्यावर झालेला आहे. त्यामुळे रस्त्यावरच्या लढाया आम्हाला माहीत आहेत. आता तुमचा गिरीश महाजन थोड्या वेळाने येईल आणि तो म्हणेल यांना काय कळते? आम्हाला भ्रष्टाचारातले काहीही कळत नाही, तुलाच कळतं. लाज वाटली पाहिजे या सत्ताधाऱ्यांना, कसे गेट बंद करून बसले आहेत ते. गिरीश महाजन यांना देशाचा स्वातंत्र्य दिवस कितवा हे त्याला माहीत नाही आणि इथे राज्य करतोय, अशी टीका राऊत यांनी केली. ज्यांनी आयोध्येतल्या रामाला सोडले नाही, ते पंचवटीमधल्या रामाला काय सोडणार? पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, अमित शहाला आम्ही पळवले, गिरीश महाजन काय आहे. हा संताप, ही चीड, हा राग, ही आग, ही अशीच पेटती ठेवा. नाशिककरांनी आपल्याला मतदान केले नाही. मला एक म्हणाल्या की आम्ही चुकलो. मला आश्चर्य वाटते की भाजपचे आमदार आंदोलन करत आहेत रस्त्याच्या खड्ड्यावरून. नाशिकची अवस्था अत्यंत गंभीर आहे. अयोध्या आणि दुसरी अयोध्या ही. ज्या भाजपच्या लोकांनी अयोध्यामधली दान पेटी लूटली, सीतामाईचे मंगळसूत्र लुटले, त्यांचीच पिलावळे इथे आहेत. ज्यांनी आयोध्येतल्या रामाला सोडले नाही, ते पंचवटीमधल्या रामाला काय सोडणार? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. मनमानी केली तर महापालिकेचे गेट तोडून आत घुसू मी आयुक्तांना सांगू इच्छितो, नाशिकच्या महापालिकेत आमचे 15 वाघ आहेत. आमचे म्हणणे तुम्हाला ऐकावे लागेल. नाशिककरांच्या आणि विकासाच्या बाबतीत. आणि जर ऐकले नाही तर आणि मनमानी केली तर हे गेट तोडून आम्ही आत येऊ. अशा प्रकारची गेट तोडून आत घुसण्याचा अनुभव मला सगळ्यात जास्त आहे. आम्हाला याचा अनुभव आहे. ही एकजूट आपण नाशिककरांसाठी दाखवली, ही अशीच ठेवा. केशव आता आयुक्तांना भेटणार आहेत. आम्हाला तुम्ही मुदत द्या, नाशिकचे खड्डे कधी बुजवणार आहेत, त्याची तारीख सांगा, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
Source link
नाशिकमधील खड्ड्यांवरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक:मनमानी केल्यास महापालिकेचे गेट तोडून घुसू, संजय राऊतांचा प्रशासनाला इशारा