Headlines

अन्नभेसळीविरोधात तुकाराम मुंढेंचा धडाका:CM देवेंद्र फडणवीसांकडून कारवाईचे कौतुक, म्हणाले- अशी धडक कारवाई सुरू राहील




आयएएस तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यापासून संपूर्ण राज्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि आरोग्यास हानीकारक उत्पादनांवर कारवाईचा धडाका लावला आहे. एफडीएच्या पथकांकडून दररोज राज्यभरात धाडी टाकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तसेच अस्वच्छता बाळगणाऱ्या हॉटेल्स, डेअरी व दुकानांचे परवाने थेट निलंबित केले जात आहेत. दरम्यान, मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या धडक आणि आक्रमक मोहिमेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाच्या संदर्भात तसेच त्यांनी सुरू केलेल्या मोहिमेसंदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले, भेसळयुक्त पदार्थांमुळे एखाद्याच्या जीवाला धोका असतो. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता होती आणि ही कारवाई सध्या सुरू आहे, याचा मला आनंद आहे. तसेच यापुढेही एफडीएची अशी धडक कारवाई सुरू राहील, असे फडणवीस यांनी म्हटले. अन्नभेसळ करणाऱ्यांवर आता थेट ‘मकोका’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात 11 ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यात सुरू असलेल्या धडक कारवायांची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली. यावर कठोर पावले उचलत, दूध, पनीर, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या गुन्हेगारांवर थेट ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचे कडक आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. खाद्यपदार्थांमधील भेसळीचा नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत गंभीर आणि घातक परिणाम होत असल्याने अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे काळाची गरज असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, या प्रकरणांची न्यायालयात सुनावणी होताना कोणतीही कायदेशीर पळवाट किंवा त्रुटी राहू नये, यासाठी अनुभवी कायदेतज्ज्ञांची मदत घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी या हेतूने तातडीने एका विशेष कायदेशीर पथकाची स्थापना करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *