Headlines

श्रीरामपुरातील 200 भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण:प्रशासनाचा बंदोबस्त सुरू, 1,536 कुत्र्यांची नोंद; श्वान केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी‎




शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, दवाखाने तसेच रहिवासी भागांत कुत्र्यांचे मोठमोठे टोळके फिरत असल्याने पादचारी, दुचाकीस्वार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याबाबत ‘दिव्य मराठी’ने ११ ऑगस्टच्या अंकातून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी श्रीरामपूरला भेट देत नगरपालिकेच्या श्वान केंद्राची पाहणी करून उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, आरोग्य विभागाचे रावसाहेब घायवट, डॉ. अक्षय दहातोंडे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. शहरातील अनेक भागांत विशेषतः रात्री भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. वाहनांच्या मागे धावणे, पादचाऱ्यांचा पाठलाग करणे तसेच अचानक रस्त्यावर येणे यामुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होत आहे. रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना या समस्येचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत, अन्यथा नगरपरिषदेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन नगराध्यक्ष करण ससाणे व मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी केले आहे. कचरा, मांसाहारी बाजारातील उष्टे अन्न कारणीभूत शहरासह ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. उघड्यावर टाकला जाणारा कचरा, मांस व मच्छी मार्केटमधील उष्टे अन्न तसेच वेळेवर निर्बीजीकरण न होणे यामुळे कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच आसपासच्या भागांतून रात्री-अपरात्री कुत्रे श्रीरामपूर व बेलापूर परिसरात आणून सोडले जात असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत. अशा प्रकारे कुत्रे आणून सोडणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. नगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात १,५३६ भटके कुत्रे आढळून आले. त्यापैकी २०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. उर्वरित कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची प्रक्रिया वेगाने राबविण्याची गरज आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *