Headlines

पुण्यात 'एएनटीएफ'ची कारवाई:कोंढव्यात अडीच किलो गांजा जप्त; सराईतासह 30 जण ताब्यात, खरेदीदारांची कसून चौकशी




कोंढवा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANTF) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला असून, एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. गांजा खरेदीसाठी आलेल्या सुमारे 30 जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणी गणेश पाटोळे आणि आजू अहमद शेख यांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात गणेश पाटोळे हा गांजा विक्री करणारा मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. आजू शेख याने गणेश पाटोळे याला दररोज 500 रुपये रोजंदारीवर कामावर ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सला कोंढवा परिसरात गांजा विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला. कारवाईदरम्यान गणेश पाटोळे याला रंगेहाथ पकडण्यात आले आणि त्याच्याकडून अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याचवेळी गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या 30 जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या सर्व व्यक्तींची स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे. गांजाचा स्रोत काय होता, तो कोणाला विकला जात होता आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. ताब्यात घेतलेल्यांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विक्रीच्या साखळीतील इतर आरोपींचा शोध घेण्यात येणार आहे. अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या आयजी ज्योतिप्रिया सिंग, डीआयजी प्रवीण पाटील आणि पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक राहुल होळकर, तसेच पोलिस कर्मचारी साबळे, तुपे, एलपीसी ढेबे आणि कळसकर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *