Headlines

आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिवाची कवडीचीही किंमत नाही का?:गडचिरोलीतील 3 बळींनंतर पळसन आश्रमशाळेच्या दुरवस्थेवरून वडेट्टीवारांचे सरकारवर टीकास्त्र




गडचिरोली येथील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेने राज्यातील आदिवासी आश्रमशाळांच्या सुरक्षेचा आणि दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पळसन शासकीय आश्रमशाळेचा एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करत राज्य सरकार आणि प्रशासनावर सडकून टीका केली आहे. “निष्पाप विद्यार्थिनींचे बळी जाऊनही हे निर्दयी सरकार आणि ढिम्म प्रशासन जागे झालेले नाही,” असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. काय घडले गडचिरोलीत? 10 ऑगस्टच्या मध्यरात्री गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत मण्यार सापाने दंश केल्याने दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी या तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. खाटांची कमतरता असल्याने या मुली जमिनीवर झोपल्या होत्या. या भीषण वास्तवाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोग्य विभागाने सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित केले आहे. तसेच, राज्यातील सर्व आश्रमशाळांचे तीन महिन्यांत ‘थर्ड पार्टी ऑडिट’ (तृतीय-पक्ष परीक्षण) करण्याची घोषणा सरकारने केली आहे. पळसन आश्रमशाळेत काय समोर आले? गडचिरोलीच्या घटनेनंतरही प्रशासनाने धडा घेतला नसल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी पळसन आश्रमशाळेतील विदारक चित्र मांडले आहे: पळसन आश्रमशाळेत खाटांअभावी तब्बल 440 विद्यार्थ्यांना सक्तीने जमिनीवर झोपावे लागते. गडचिरोलीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर हा सुरक्षेतील अत्यंत मोठा आणि जीवघेणा निष्काळजीपणा आहे. उघड्यावर कपडे धुण्याची नामुष्की रात्रीच्या अंधारात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना उघड्यावर कपडे धुवावे लागतात. सापांचा आणि वन्यजीवांचा वावर असलेल्या भागात हा प्रकार विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू शकतो. “आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिवाची शासनाला कवडीचीही किंमत नाही का? मूलभूत सोयी-सुविधा मिळत नसतील तर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी जातो कुठे? गरिबांच्या लेकरांच्या नावाने पैसा ओरबाडण्याचे धंदे सरकारने बंद करावेत,” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आश्रमशाळांच्या पारदर्शक ‘ऑडिट’ची गरज पळसनमध्ये सर्पदंशाची घटना घडलेली नसली तरी, तेथील गैरसोय आणि गडचिरोलीतील बळी यातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासी सुरक्षेचा समान प्रश्न समोर येतो. कागदोपत्री ऑडिट करण्याऐवजी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करणे अपेक्षित आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र खाट आणि मुलींसाठी सुरक्षित, स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत का? पाणीपुरवठा आणि रात्रीची पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध आहे का? आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिका किती वेळात मिळते? शासनाकडून मंजूर झालेला कोट्यवधींचा निधी नेमका कोणत्या कामांवर आणि कसा खर्च झाला? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. सरकारसमोर दुहेरी आव्हान विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी न झाल्यास रस्त्यावर उतरून जाब विचारण्याचा इशारा दिला आहे. गडचिरोलीच्या घटनेनंतर हा विषय केवळ राजकीय आरोप म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. गरीब आणि आदिवासी कुटुंबांतील मुले शिक्षणासाठी शासनाच्या व्यवस्थेवर अवलंबून असतात. त्यामुळे आता पळसन आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी देणे, हे सरकारसमोरील मोठे आव्हान आहे. हेही वाचा… चिन्ह आम्ही नाही, निवडणूक आयोगाने दिले:शंभूराज देसाईंची ठाकरे गटावर टीका, म्हणाले- धनुष्यबाण गोठवा म्हणणे म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवणे “धनुष्यबाण हे केवळ एक चिन्ह नसून ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. बाळासाहेबांनी या चिन्हाला देवाऱ्यात पुजले होते. आता ‘धनुष्यबाण आम्हाला मिळत नसेल तर तो गोठवून टाका’, ही मागणी करणे म्हणजेच बाळासाहेबांचे विचार गोठवण्यासारखे आहे,” असा जोरदार घणाघात शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटावर केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाने (उबाठा) केलेल्या मागणीवर प्रतिक्रिया देण्यासाठी शंभूराज देसाई यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *