Headlines

दिव्य मराठी ब्रेकिंग‎:सॉफ्टवेअर विक्रीतून कोट्यवधी कमावल्याचा सीएचा दावाही बोगस, उदगीर येथे सलग तिसऱ्या दिवशीही शोधमोहीम




लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाच्या (इन्कम टॅक्स) अन्वेषण शाखेने एका बड्या सनदी लेखापालाच्या (सीए) कार्यालयासह निवासस्थाने व संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल १५०० कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला. ही शोधमोहीम तिसऱ्या दिवशी सुरू असून अजून दोन दिवस चालण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या सीएने ज्या कंपन्यांचे व्यवहार दाखवले आहेत, त्या सर्व देशभरातील २७ वेगवेगळ्या शहरांमध्ये आयटी कंपन्यांच्या नावाने नोंदणीकृत आहेत. मात्र वास्तवात त्या नोंदणी केलेल्या पत्त्यावर अस्तित्वातच नसल्याची बाब समोर आली आहे. नाशिक व छत्रपती संभाजीनगरच्या अन्वेषण शाखेच्या संयुक्त पथकानेही ही कारवाई केली असून आणखी दोन ते तीन दिवस हे सर्च ऑपरेशन चालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उदगीर शहरातील एका व्यावसायिक संकुलात बुधवारी भल्या पहाटेच ६ वाजेच्या सुमारास वेगवेगळ्या दिशेने १० ते १५ गाड्यांचा ताफा धडकला. या ताफ्यातील अधिकाऱ्यांनी आधीच गोपनीय पद्धतीने माहिती जमा केली होती. देशात २७ शहरांतील कंपन्या आणि विदेशातील ७ संस्थांशी व्यवहार संपूर्ण गैरव्यवहाराची कार्यपद्धती आणि त्यामागील साखळी समजून घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. या रॅकेटमध्ये मलेशिया, थायलंड, सिंगापूर आणि ब्रिटन यांसारख्या देशांमधील ज्या परदेशी संस्थांना हा निधी वळवण्यात आला आहे, त्यांचाही कसून तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत नवी मुंबई, पुणे, चंदीगड, दिल्ली, नोएडा, हैदराबाद, चेन्नई यांसह वेगवेगळ्या तब्बल २७ मोठ्या शहरांतील आयटी कंपन्यांच्या नावाने हे व्यवहार करण्यात आले आहेत. हे व्यवहार सॉफ्टवेअर विक्रीतून पैसे फिरवल्याचा संशय आहे. प्रत्यक्षात या शहरांत संबंधित पत्त्यांवर अशा कंपन्याच नसून सर्वच नोंदी बनावट आढळून आल्या आहेत. विभागात माहिती फुटल्याचा संशय; सीए पळाल्याने शोधमोहीम आयकर विभागाच्या अन्वेषण शाखेने या छाप्याची अत्यंत गुप्तता बाळगली होती. ६० हून अधिक तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा या मोहिमेत सहभागी होता. तरीदेखील पथकाने छापा टाकल्यावर घर व कार्यालय या दोन्ही ठिकाणाहून सीए गायब झाल्याचे दिसून आल्याने पथकाला धक्का बसला. अंतर्गत बातमी लीक झाल्याचा संशय व्यक्त करत पथकाने लागलीच त्वरित स्वतंत्र पथके कार्यालये व घरी तैनात केली आणि वेगवेगळ्या पथकांनी २४ तास संपूर्ण उदगीर, लातूरमध्ये संशयित सीएचा शोध घेतला. अखेरीस पथकाने स्वतःचे खबऱ्यांचे नेटवर्क वापरून त्याच्या मुसक्या आवळत त्याला ताब्यात घेतले व त्याच्यासमक्ष कार्यालयात झडती सत्र राबवले. अधिकाऱ्यांनी अनुभवाचा आणि आधुनिक तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करत त्याचा माग काढला. तब्बल १५०० कोटींचे ‘शॅम’ व्यवहार आणि विदेशी कनेक्शनचाही संशय परदेशात करण्यात आलेल्या ‘आऊटवर्ड फॉरेन रेमिटन्स’शी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. हे व्यवहार सुमारे १५०० कोटी रुपयांचे असून ते पूर्णपणे संशयास्पद, दिशाभूल करणारे आणि बनावट (शॅम) असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या कोट्यवधींच्या बेकायदेशीर विदेशी व्यवहारांना अधिकृत दाखवण्यासाठी लागणारे ‘प्रमाणपत्रीकरण’ याच सीएने केल्याचे समोर आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *