Headlines

खंडाळा:जीवाला जीव देणारा नव्हे तर जीवनासाठी दिशा देणारा मित्र बनवा : इंदुरीकर महाराज




आजची मुले म्हणतात हा माझा जिगरी मित्र आहे, जीवाला जीव देणारा आहे. अरे, जीवाला जीव देऊन काय उपयोग? जर तुझं जीवनच वाया जात असेल तर अशा मैत्रीचा काय फायदा? मित्र असा बनवा जो तुम्हाला दारू, गुटखा या वाईट सवयींतून बाहेर काढेल. जो व्यसनाकडे नाही तर शिक्षणाकडे नेईल. जो म्हणेल अरे अभ्यास कर आणि आई-बापाचं नाव मोठं कर, तोच खरा मित्र, असे प्रतिपादन कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले. खंडाळा येथे सुरू असलेल्या श्री संत शंकर स्वामी महाराज यांच्या २८१ व्या फिरत्या नारळी सप्ताहानिमित्त शुक्रवारी आयोजित कीर्तनात ते बोलत होते. प्रत्येक महिलेने आपल्या घरात ज्ञानेश्वरी ठेवावी, कारण ज्ञानेश्वरी हा अमृताचा महासागर आहे. पूर्वी प्रत्येक घरात रामायण, महाभारत असायचे. आता टीव्हीवर मालिका आहेत. महिलांनी घरात ज्ञानेश्वरी ठेवली तर भांडणे होणार नाहीत. ज्ञानेश्वरी वाचली की मन शांत होते. ज्या घरात ज्ञानेश्वरी आहे, तिथे संस्कार आहेत. मोबाइलमध्ये रील्स बघण्यापेक्षा दिवसातून एक ओवी वाचली तरी कल्याण होईल. महिला ही घराची लक्ष्मी आहे. तिने ठरवले तर घर स्वर्ग बनते आणि ठरवले तर नरक. त्यामुळे संसारात ज्ञानेश्वरीला स्थान देणे आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, जि. प. सदस्य संजय पाटील निकम, जि. प. सदस्य मनोज गायके, श्री संत शंकर स्वामी महाराज संस्थानचे अध्यक्ष एकनाथ जाधव, माजी उपनगराध्यक्ष हाजी अकील शेख, कल्याण दांगोडे, उमाकांत ठोंबरे, हमीद कुरेशी, दिनकर भंडारी, संदीप निर्मळ, जयेश पालेजा, ज्ञानेश्वर टेके, बशीर कुरेशी आणि युवराज चेळेकर आदींसह विविध गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताहानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. कीर्तनासाठी उपस्थित असलेल्या ३५ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ या कीर्तनाला ३५ हजार भाविकांनी उपस्थिती लावून ज्ञानदानासह महाप्रसादाचा लाभ घेतला. हा सोहळा पार पाडण्यासाठी दोन हजार स्वयंसेवक अहोरात्र श्रमदान करत आहेत. सप्ताहाच्या शेवटच्या महाप्रसादासाठी ६० क्विंटलपेक्षा अधिक प्रसाद तयार करण्यात आला आहे. श्री शंकर स्वामी महाराजांच्या सप्ताहात सर्वधर्मसमभावाचे अनोखे दर्शन घडले. कीर्तनासाठीच्या मुख्य मंडपाची जागा मुस्लिम बांधव अक्रम पठाण यांनी दिली, तर महाप्रसाद बनवण्यासाठी लागणारे भंडारगृह व भोजनासाठी बौद्ध बांधव भीमराव खंडिझोड यांनी आपली शेतजमीन उपलब्ध करून दिली. तसेच सोमवारच्या एकादशीनिमित्त माजी उपनगराध्यक्ष हाजी अकील शेख यांच्या वतीने संपूर्ण दिवसाच्या फराळाची पंगत देण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *