![]()
काका, समोर चोरी झाले आहे. आम्ही पोलिस आहोत, तुम्ही तुमच्या अंगठ्या काढून ठेवा असा प्रेमाचा सल्ला देत एका भामट्याने सेवानिवृत्त शिक्षकाच्या हातातील अंगठी पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २१ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. नेमके प्रकरण काय आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील पंचशिल नगर येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त शिक्षक गुंडीबा थोरात हे कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ते मदिना चौकातून पंचशिल नगरकडे जात होते. यावेळी एक भामटा त्यांच्याजवळ आला, काका आम्ही पोलिस आहोत, समोर चोरी झालेली आहे. तुमच्या हातातील अंगठ्या काढून ठेवा असा सल्ला दिला. मात्र सुरवातीला थोरात यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र याचवेळी त्या ठिकाणावर त्याचा साथीदार आला. भामट्याने त्याच्या साथीदाराला अंगठी काढून ठेवण्यात सांगितले. त्याने अंगठी काढून कागदात गुंडाळून खिशात ठेवली. यामुळे थोरात यांचा भामट्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्यांनी त्यांच्या हातातील ६० हजार रुपये किंमतीची ६ ग्राम वजनाची सोन्याची अंगठी भामट्याजवळ दिली. त्याने हातचालाखी करून अंगठी काढून घेतली अन कागदात दगड गुंडाळून त्यांच्या हातात दिला. त्यांनी तो कागदाचा गुंडाळा खिशात ठेवला. त्यानंतर तो भामटा पसार झाला. दरम्यान, काही वेळाने थोरात हे घरी आल्यानंतर त्यांनी कागदाचा गुंडाळा उघडून पाहिला असता त्यात अंगठीच्या ऐवजी दगड दिसला. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सदर प्रकार त्यांच्या कुटुंबियांना सांगितला. याप्रकरणी थोरात यांनी वसमत शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी भामट्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक शिवाजी बोंडले पुढील तपास करीत आहेत.
Source link
प्रेमाचा सल्ला देत भामट्याची हातचलाखी:सेवानिवृत्त शिक्षकाची 60 हजार रुपये किंमतीची अंगठी पळवली