![]()
भाजपचे तिवसा तालुका उपाध्यक्ष प्रवीण बडकस (वय ४३, रा. मारडा) यांचे शुक्रवारी रात्री रस्ता अपघातात निधन झाले. मारडाजवळ त्यांची दुचाकी विद्युत खांबावर आदळल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण बडकस हे कुऱ्हा येथील कामे आटोपून रात्री दुचाकीने आपल्या गावी मारडा येथे परतत होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास मारडाजवळ अचानक त्यांचे वाहन अनियंत्रित झाले आणि ते एका विद्युत खांबावर आदळले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी दुपारी मारडा येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार राजेश वानखडे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, प्रदीप गौरखडे, धीरज केने, संदीप आमले, अजय गुल्हाने, रवींद्र हांडे, मनोज अडसड, विठ्ठल रुक्मिणी संस्थेचे अतुल ठाकरे, सरपंच, उपसरपंच आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि मोठा आप्त परिवार आहे.
Source link
मारडाजवळ दुचाकी अपघातात भाजप उपाध्यक्षाचा मृत्यू:प्रवीण बडकस यांचे निधन, कुऱ्हा येथून परतताना घडली घटना