![]()
अजिंठा-बुलढाणा महामार्गावरील शिवना येथे अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठीच्या मोहिमेला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय रस्ते प्राधिकरणाने ही कारवाई हाती घेतली असून, अतिक्रमणामुळे कोंडलेला या महामार्गाचा श्वास आता मोकळा होणार आहे. खान्देश, विदर्भ व मराठवाड्याच्या सीमांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गावर शिवना येथे रस्ते अपघातांना आळा घा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अतिक्रमण काढले जात आहे. भर रस्त्यावर मांडलेली दुकाने, टिन पत्र्याचे शेड आणि बॅनरच्या फ्रेम्समुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होऊन येथे अनेक लहान-मोठे अपघात घडले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते प्राधिकरणाच्या नियमानुसार अनधिकृत अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून सूचना देण्यात आल्या होत्या. अखेर गुरुवारी पोलिसांच्या चोख बंदोबस्तात प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पथकाने अतिक्रमित जागेवर थेट जेसीबी चालवल्याने मुख्य स्थानक परिसरात खळबळ उडाली होती. पथक आल्याचे पाहताच व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली. माजी उपसरपंच गणेश सपकाळ यांच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांना दुभाजकापासून १२ ते १४ मीटरची जागा मोकळी करण्यासाठी दोन दिवसांचा अतिरिक्त अवधी देण्यात आला आहे. १० ऑक्टोबर रोजी पथक पुन्हा दाखल होणार १० ऑक्टोबर रोजी या मोहिमेचे पथक ताफ्यासह पुन्हा दाखल होणार असून, तोपर्यंत मार्किंग केलेली जागा स्वतःहून मोकळी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे विभागीय अभियंता जी. व्ही. धानोरकर, अजिंठा ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.
Source link
शिवन्यात महामार्गावरील अतिक्रमणावर हातोडा:रस्ता मोकळा करण्याचे आदेश, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय रस्ते प्राधिकरणाकडून मोहीम