Headlines

18 तारखेपर्यंत पाणी द्या; अन्यथा भातकुडगाव फाट्यावर आंदोलन:मायनरचे राहिलेले भरणे पूर्ण करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी‎




भातकुडगाव इरिगेशन कॉलनीअंतर्गत राहिलेले मायनर क्रमांकांचे भरणे १८ तारखेपर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी जोहरापूर, लोळेगाव, सामणगाव व भातकुडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. मागणीची पूर्तता न झाल्यास भातकुडगाव फाटा येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन दिले. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात असून, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यास उभी पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहिलेले मायनरचे भरणे तातडीने पूर्ण करून अंतिम भागातील शेतकऱ्यांनाही सिंचनाचे पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात आली. पाणीप्रश्नाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक कार्यवाही होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून राहिलेले काम तातडीने पूर्ण करावे आणि पाणीवाटपाचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी जोर धरत आहे. पाणी आमच्या हक्काचे आहे. वारंवार मागणी करूनही प्रश्न मार्गी लागत नसेल, तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अशी संतप्त भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. १८ तारखेपर्यंत मायनरचे राहिलेले भरणे पूर्ण करून पाणी न मिळाल्यास भातकुडगाव फाटा येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर अशोकराव देवढे, एकनाथराव काळे, संदीप राव बामदळे, आजिनाथ उगलमुगले, गोरक्षनाथ गरजे, नंदू मुसबत, दादासाहेब देवढे, अशोक पंडित, अशोक घुमरे, एकनाथ घुमरे, महादेव वने, योगेश थोरे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत पाण्यासाठी शेतकरी संघर्ष करत असताना पाटबंधारे विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *