![]()
जळालेला ट्रान्सफॉर्मर मोफत बदलून देणे महावितरणचे कर्तव्य असताना त्यासाठी तीन लाख रुपयांपर्यंत बेकायदेशीर वसुली केल्याच्या गंभीर तक्रारींनी अकोले महावितरणच्या विशेष जनसंवाद बैठकीत खळबळ उडाली. अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला. या तक्रारींची गंभीर दखल घेत अहिल्यानगर परिमंडळाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार यांनी अकोले कार्यालयासाठी पुढील १५ दिवसांत पाच ते सहा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर राखीव ठेवण्याचे, तसेच आवश्यक साहित्य २४ तासांत मोफत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. गुरुवारी (८ ऑक्टोबर) झालेल्या बैठकीला माजी आमदार वैभवराव पिचड उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आदेशाने बैठक घेण्यात आली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या बैठकीत ग्राहकांनी वीजपुरवठा, ट्रान्सफॉर्मर, मीटर, डीपी हलविणे, कमी दाब आणि बिल दुरुस्तीच्या तक्रारींचा पाढाच वाचला. ठेकेदार नीलेश भांगरे उपस्थित होता. पवार यांनी स्पष्ट केले की, महावितरणकडे ट्रान्सफॉर्मर आणि ऑइल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. जळालेला ट्रान्सफॉर्मर २४ तासांत मोफत बदलणे ही महावितरणची जबाबदारी असून यासाठी ग्राहकाकडून एक रुपयाही घेता येत नाही. पैसे मागितल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई, अगदी निलंबनापर्यंतची कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. बैठकीत माधव चौधरी (धुमाळवाडी), विजय थोरात (वीरगाव), सयाजीराव पोखरकर (कोतूळ), देवीदास चौधरी (अकोले), राहुल देशमुख (उंचखडक बुद्रुक), निलेश तळेकर (शेलद), गणेश पापळ (धामणगाव आवारी), रेश्मा गोडसे (लहीत बुद्रुक), बाळासाहेब डोके (गर्दणी), कोंभाळणे, सुगाव खुर्द, उंचखडक बुद्रुक, दत्तु यादव (शेलद), पंढरीनाथ नाईकवाडी (कारवाडी, अकोले), नितीन शहा (खिरवीरे), वांजुळशेतचे सरपंच तुकाराम कोंडार, सविता भांगरे (शेंडी), भाऊसाहेब बराते ( वाघापूर) यांनी गंभीर तक्रारी केल्या. अकोले तालुक्यात आवश्यक ठिकाणी क्षमतेनुसार ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे आदेश देण्यात आले. तसेच सोमवार व गुरुवारी विशेष बिल दुरुस्ती शिबिरे घेण्याचे निर्देश पवार यांनी दिले. पैसे मागितले तर पोलिसांत जा ट्रान्सफॉर्मर बदलणे किंवा महावितरणचे इतर काम करून देण्यासाठी अधिकारी, कर्मचारी अथवा ठेकेदाराने पैसे मागितल्यास ग्राहकांनी गप्प न बसता पोलिसांत फिर्याद दाखल करावी. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून संबंधितांना रंगेहाथ पकडून द्यावे. सबळ पुराव्यासह महावितरणकडे लेखी तक्रार दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे अधीक्षक अभियंता रमेश पवार यांनी सांगितले. ट्रान्सफॉर्मर जळाल्यावर ग्राहकांचे हक्क .जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलणे ही महावितरणची जबाबदारी आहे. ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी ग्राहकाकडून अनधिकृत पैसे मागता येत नाहीत. अधिकारी, कर्मचारी किंवा ठेकेदाराने पैसे मागितल्यास पुराव्यासह तक्रार करता येते. .लाच मागितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करता येते. पैसे घेतल्याचा पुरावा असल्यास संबंधिताविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी करता येते. .तक्रार करताना तारीख, ठिकाण, संबंधित व्यक्तीचे नाव, मागितलेली रक्कम, फोन संभाषण/मेसेज आदी पुरावे जतन करणे महत्त्वाचे.
Source link
जनसंवादात संताप:ट्रान्सफॉर्मर 24 तासांमध्ये बदलण्याचा नियम; अकोल्यात मात्र पैशांच्या तक्रारी, अधीक्षक अभियंत्यांचे 24 तासांत ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे आदेश