Headlines

दिवसा सौरऊर्जा साठवणार, सायंकाळी शेतीला वीज:राहात्यात 5 बॅटऱ्यांचा प्रयोग, राहाता तालुका व परिसरातील वीजपुरवठ्याचे चित्र बदलणार


.

दिवसा निर्माण होणारी सौरऊर्जा बॅटरीमध्ये साठवून विजेची मागणी वाढलेल्या वेळेत तीच वीज शेतीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयोग राहाता तालुक्यात आकार घेत आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेला बॅटरी बेस प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, तो कार्यान्वित झाल्यानंतर राहाता व परिसरातील शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळेत सलग आठ तास वीज उपलब्ध करून देण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

पुणतांबे परिसरातील रास्तापूर शिवारात सुमारे ८० एकर जागेवर २० मेगावॉट क्षमतेचे सौरवीज निर्मिती केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या केंद्रातून दिवसा निर्माण होणारी वीज सध्या मुख्य वीजप्रवाहात पाठवली जाते. मात्र, सौरऊर्जा उपलब्धतेची वेळ आणि सायंकाळच्या वाढत्या विजेच्या मागणीमध्ये तफावत निर्माण होते. ही तफावत भरून काढण्यासाठी राहाता येथील वीज उपकेंद्रात बॅटरीद्वारे वीज साठवणुकीची व्यवस्था उभारली जात आहे.

वीज उपकेंद्रात प्रत्येकी अडीच मेगावॉट क्षमतेच्या पाच मोठ्या बॅटऱ्या बसविण्यात येत आहेत. या व्यवस्थेत दररोज सुमारे साडेआठ मेगावॉट वीज साठवता येणार आहे. सायंकाळी मागणी वाढल्यानंतर साठवलेली वीज ३३ केव्ही उपकेंद्रातून संबंधित भागात वितरित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सौरऊर्जेचा वापर केवळ दिवसा न होता मागणीच्या वेळेतही करता येणार आहे.

राहाता, पुणतांबे, अस्तगाव, कोल्हाळे, गणेशनगर, रामपूरवाडी, एकरुखे, चोळकेवाडी, खडकेवाके, केलवड, कोल्हाळे आणि साकुरी परिसरातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होण्याची शक्यता आहे. शेतीसाठी वीजपुरवठा मागणीनुसार नियोजनबद्ध करता आल्यास पिकांना पाणी देण्याचे वेळापत्रकही अधिक सुलभ होऊ शकते.

बॅटरी स्टोरेज म्हणजे काय? सौरऊर्जा प्रामुख्याने दिवसा निर्माण होते; मात्र विजेची मागणी अनेकदा सायंकाळी वाढते. अशावेळी दिवसा निर्माण झालेली वीज मोठ्या बॅटऱ्यांमध्ये साठवून ठेवली जाते. मागणी वाढल्यानंतर ही साठवलेली वीज पुन्हा वीजप्रवाहात सोडता येते. त्यामुळे सौरऊर्जेचा वापर केवळ सूर्यप्रकाशाच्या वेळेपुरता मर्यादित राहत नाही. राहाता प्रकल्पातील पाच बॅटऱ्यांमुळे सौरऊर्जा साठवून मागणीच्या काळात तिचा शेतीसाठी उपयोग करण्याचे नियोजन आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *