Headlines

औशातील शाळेची पाहणी करणाऱ्या दिपकेंसह सात जणांवर गुन्हा दाखल:शासकीय कामात अडथळा आणल्याचा शिक्षिकेचा आरोप




शाळेत अनधिकृतपणे प्रवेश करून विद्यार्थ्यांमध्ये बसणे, त्यांना विविध प्रश्न विचारणे, शैक्षणिक व शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच शाळेचे चित्रीकरण करून ते माध्यमांवर प्रसारित केल्याच्या आरोपावरून कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्यासह ७ जणांविरुद्ध औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जि.प केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षिका सय्यद समशादबानो खैरातअली (५३) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २० ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १.१० वाजता अभिजित दिपके, अजिंक्य शिंदे तसेच चार ते पाच अनोळखी व्यक्ती शाळेत आल्या. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसून विविध प्रश्न विचारले. त्यामुळे शाळेतील शैक्षणिक तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या व्यक्तींनी शाळेत अनधिकृत प्रवेश करून चित्रीकरण केले. ते माध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप आहे. तसेच शाळेतीलच विद्यार्थी असल्याचे भासवून दुसऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणून बसवल्याचा आरोप आहे. यामुळे शाळेची बदनामी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, संबंधित शिक्षकांकडे पाहून अपमानास्पद भाषा वापरण्यात आली. त्यांना निलंबित करण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी अभिजित दिपके, अजिंक्य शिंदे आणि चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १३२, ३२९(३), ३५१(२), ३५६(२) व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ४८८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.०३ वाजता औसा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. पोलिस निरीक्षक आर. के. डमाळे यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक महेश गायकवाड पुढील तपास करीत आहेत. मराठी शाळेत आणून बसवले उर्दू माध्यमाची मुले जावळी येथील जि.प.च्या उर्दू शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने येथील शाळा औसा येथील जि.प. च्या शाळेत स्थलांतरित करण्यात आली होती. दिपके येणार म्हणून विद्यार्थ्यांसाठी जेवणाच्या नवीन प्लेटही मागवण्यात आल्या होत्या. दुसऱ्या शाळेतील मुले येथे का आणून बसवली, असा आक्षेप घेत दिपके यांनी तेथे चित्रीकरण करत शिक्षकांना तुमची नोकरी जाईल, असे सुनावले. यावरच नाराज शिक्षिकेने दिपके व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार दिली. असे हजार गुन्हे घेण्यास तयार आहोत शाळेतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेल्यामुळे आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण भागातील शालेय शिक्षण व्यवस्था नीट व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. अशा वेळी जर असे गुन्हे दाखल होत असतील तर असे हजार गुन्हे घेण्यास आम्ही तयार आहोत. शाळा परिसरात नशा करणाऱ्या लोकांचा वावर आहे. मुलांना पिण्याचे पाणी नाही. स्वच्छतागृह नाही. ही अवस्था नीट होईपर्यंत आम्ही काम करतच राहणार. – अजिंक्य शिंदे, संघटन प्रमुख, सीजेपी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *