![]()
पावसाच्या दीर्घ खंडाचा फटका पिकांना बसला आहे. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत देण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्
.
यंदा उन्हामुळे प्रचंड त्रस्त झालेल्या अकोलेकरांना धो-धो पाऊस बरसेल, अशी अपेक्षा होती. मात्र जून महिन्याच्या प्रारंभी फारसा पाऊस झाला नाही. २३ जून रोजी रात्री महानगरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. जुलै महिन्यात उकाडा प्रचंड वाढला. मात्र महिन्याच्या अखेरीस सकाळी पाऊस बरसला. संध्याकाळपर्यंत सुरूच होता. मात्र आता पुन्हा २२ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान, क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गरेंद्र मालठाणे यांना निवेदन सादर केले. पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. सोयाबीन, मूग, उडीद यांसह कापूस, तूर व इतर पिके सुकत आहेत. पाण्याचा मोठा ताण निर्माण झाला आहे. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात तत्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, जिल्हा उपाध्यक्ष संजय सोनोने, अकोला तालुका अध्यक्ष मंगेश गावंडे, पूर्णाजी खोडके, सुनील इंगळे, रमेश चिंचे, शंकर सनगाडे यांच्यासह शेतकरी, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पावसाअभावी जमिनीतील ओलावा होतोय कमी सध्या सोयाबीन पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र, पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी सोयाबीनमध्ये फुलगळ, शेंगांची संख्या कमी होणे, दाणे न भरण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कापूस, तूर, मूग व उडीद पिकांवरही पावसाअभावी विपरीत परिणाम होत आहे. ही परिस्थिती केवळ पावसाचा खंड नाही. दुष्काळसदृश गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी. तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.
पीके पूर्णपणे हातातून गेल्यानंतर पंचनामे करण्यापेक्षा आजच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करा. तातडीने मदत जाहीर करा, अशी मागणी चंद्रशेखर गवळी यांनी केली. शासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेतली नाही, तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.