![]()
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुनील देशमुख यांनी आज, शनिवारी माध्यमांसमोर शहरातील विविध प्रलंबित योजना आणि सध्यस्थितीत भेडसावणाऱ्या समस्यांची मांडणी केली. त्यांच्या मते ज्यांनी या प्रश्न-समस्यांची सोडवणूक करायला हवी, ते लोकप्रतिनिधी यासाठी सरकारकडून ठोस कृती करवून घेण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे एका अर्थाने तेच जनतेचे शत्रू (त्यांच्या शब्दांत – एनिमी ऑफ द पीपल) असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याचवेळी प्रशासनावरही तीव्र शब्दात ताशेरे ओढले. डॉ. सुनील देशमुख हे स्वत: १५ वर्षे राज्य सरकारमध्ये होते. त्या काळात वित्त व नियोजन राज्यमंत्रीपदही त्यांनी सांभाळले आहे. त्यावेळी केल्या गेलेल्या कामांची सध्यस्थितीशी तुलना करीत त्यांनी काही बाबींकडे जनतेचे लक्ष वेधले. ते म्हणाले, लोकप्रतिनिधी हे लोकांचे हक्क व त्यांच्या सोयी-सुविधांसाठी काम करणारी यंत्रणा आहे. परंतु सध्यस्थिती पाहू जाता ते तसे वागताना दिसत नाही. त्यामुळेच ते जनतेचे शत्रू ठरतात. कोणार्क कंपनीला दिलेला स्वच्छता कंत्राट, त्यातील अनागोंदी, दडलेला भ्रष्टाचार आणि हतबल झालेले नागरिक या मुद्द्यापासून त्यांनी सुरुवात केली. पुढे भविष्यात लादला जाणारा मालमत्ता कर, कायदा व सुव्यवस्था, विस्कळीत झालेली वाहतुक व्यवस्था, अतिक्रमणाने गिळंकृत झालेले रस्ते, व्यापारी संकुलाच्या भाडेवाढीवर मनपाने साधलेले मौन, वर्षानुवर्षांपासून रखडलेली भुयारी गटार योजना, वर्षभरापासून बंद पडलेला राजकमल चौकातील रेल्वे उड्डाण पुल, सीएसटीऐवजी दादरपर्यंतच धावणारी अंबा एक्सप्रेस, सायन्स कोर मैदान व परकोटाची होत असलेली दूरवस्था, फिशरीज हब, कांक्रीट रस्त्याची ढासळलेली गुणवत्ता, जीएमसीच्या जागेचा वाद आदी अनेक मुद्द्यांवर ते भरभरुन बोलले. या सर्व समस्यांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वचकहीन झालेले प्रशासन दोषी असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर, माजी महापौर विलास इंगोले व मिलींद चिमोटे, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी नगरसेवक किशोर बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी आता अधिकाऱ्यांसारखे वागावे महापालिका आयुक्तांकडे लक्ष वेधत ते म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून शहराच्या विविध भागांची पाहणी करणे, तेथे अमूक-ढमूक करा असे अधिकाऱ्यांना निर्देश देणे, त्यासाठी जनतेच्या पैशातून फोटोसेशन सुरु आहे. त्यासाठी त्यांनी आयुक्तांनी अलिकडेच केलेली ऑक्सीजन पार्कची पाहणी, त्याववेळी दिलेले निर्देश आणि सध्याची स्थिती हे उदाहरणही पुढे केले. किती वेळा कोर्टात जावे बेलोरा विमानतळाचा प्रारंभ असो की प्रचंड वर्दळ असलेला इतवारा बाजारातील उड्डाणपुल या मुद्द्यांवर डॉ. सुनील देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात धाव घेतली. पुढे त्या प्रकल्पांना ठराविक वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाला धावपळ करावी लागली. मात्र अशाप्रकारे मी किती वेळा कोर्टात जावे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
Source link
प्रशासनावरही ओढले ताशेरे, शहरात समस्यांचा डोंगर:लोकप्रतिनिधींचे सरकारकडून ठोस कृती करवून घेण्याकडे सर्रास दुर्लक्ष- माजी मंत्री देशमुख