Headlines

अमरावतीत महिला होमगार्डसाठी ताण-तणाव निवारण कार्यशाळा:डॉ. वनिता राऊत, डॉ. कीर्ती पिंजरकर यांचे मार्गदर्शन लाभले




अमरावती येथे महिला होमगार्डसाठी ‘ताण-तणाव निवारण’ या विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. महिला होमगार्डच्या दैनंदिन कर्तव्यातील ताणतणाव, मानसिक दबाव आणि आव्हानात्मक परिस्थितीत मानसिक संतुलन कसे राखावे, यावर सविस्तर मार्गदर्शन करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. प्रसिद्ध समुपदेशक डॉ. वनिता राऊत यांनी या कार्यशाळेत महिला होमगार्डना मार्गदर्शन केले, तर डॉ. कीर्ती पिंजरकर अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. राऊत यांनी ताणतणावाची कारणे, त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम, तसेच त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी तणावाचे व्यवस्थापन स्वतः कसे करावे, याबाबत कृतीशील मार्गदर्शनही केले. डॉ. कीर्ती पिंजरकर यांनी आपले कर्तव्य बजावताना महिला होमगार्डना अनेकदा प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करावा लागतो, असे नमूद केले. अशावेळी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहणे, सकारात्मक विचार करणे आणि परिस्थितीवर संयमाने मात करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे १०० महिला होमगार्ड उपस्थित होत्या. त्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकाग्रतेने ऐकून घेतले आणि विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रनायक राम पिंजरकर यांनी केलेले नियोजन विशेष उल्लेखनीय ठरले. त्यांच्या नियोजन, महिला होमगार्डची उपस्थिती आणि संपूर्ण व्यवस्थापनाबद्दल कौतुक करण्यात आले. उपस्थितांनी सांगितले की, महिला होमगार्डच्या मानसिक आरोग्यासोबतच त्यांची कार्यक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी असे मार्गदर्शनपर उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात. या कार्यशाळेमुळे महिला होमगार्डना ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासोबतच कर्तव्य बजावताना मानसिक संतुलन राखण्याचा महत्त्वाचा संदेश मिळाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *