![]()
पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनावर दुहेरी धोरणाचा आरोप केला आहे. पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाते, तर गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी नागरिकांना पहाटेपर्यंत परवानगी का दिली जात नाही, असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी केला. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित समन्वय बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. महापालिकेतर्फे आयोजित या बैठकीला महापौर, सर्वपक्षीय पदाधिकारी, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, महापालिका अधिकारी आणि शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या आणि पब संस्कृतीला सूट दिली जाते, परंतु गणेशोत्सवातील देखावे, मिरवणुका आणि ध्वनिक्षेपकांवर वेळेची आणि नियमांची बंधने लादली जातात, असा आरोप त्यांनी केला. रात्रीच्या वेळी देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, ते पहाटेपर्यंत खुले ठेवण्याची आणि त्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात आली. यावर सह पोलीस आयुक्त संजय दराडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, गणेश मंडळांच्या भावना आणि मागण्या पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचवून योग्य निर्णय घेतला जाईल. यंदाच्या १२ दिवसांच्या उत्सवात गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशीसह एकूण पाच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकासाठी वेळेची शिथिलता देण्यात आली आहे. मंडळांना परवानगी मिळण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ राबवली जाईल. लेझर बीम आणि प्लाझ्मासारख्या घातक दिव्यांचा वापर टाळण्यावर मंडळांचे एकमत झाले असून, उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी सीसीटीव्ही आणि स्वयंसेवकांची मदत घेतली जाईल, असेही दराडे यांनी स्पष्ट केले. दहीहंडीच्या वेळेबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असल्याने त्याबाबत पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. महापौरांनी प्रशासनाला निर्देश देताना सांगितले की, गणेशोत्सव हा पुणे आणि महाराष्ट्राचा गौरव आहे. ‘एसओपी’ (Standard Operating Procedure) ही केवळ मार्गदर्शक तत्त्वे असावीत, मंडळांवर जाचक बंधने लादली जाऊ नयेत. कार्यकर्त्यांशी समन्वय साधूनच उत्सव यशस्वी करावा लागेल, असे महापौरांनी नमूद केले.
Source link
गणेशोत्सव मंडळांचा प्रशासनाला सवाल, पबना सवलत, आम्हाला का नाही?:पहाटेपर्यंत देखावे खुले ठेवण्याची मागणी; महापौरांनी दिली ग्वाही