Headlines

दुसऱ्या श्रावणी सोमवारी 80 हजार भाविक घृष्णेश्वराच्या चरणी लीन:पहाटेपासून रांगा, विश्वस्तांच्या सुरेख नियोजनामुळे होते एक तासात दर्शन



बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात आज श्रावणातील दुसऱ्या सोमवारी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. पहिल्या सोमवारप्रमाणेच दुसऱ्या सोमवारीही दर्शनासाठी रविवार रात्रीपासूनच भाविकांनी वेरूळ गावात येण्यास सुरुवात केली होती.

.

मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे ब्रह्ममुहूर्तावरच दर्शन रांगेला सुरुवात करण्यात आली. श्रावण महिन्याची तयारी गेल्या महिनाभरापासून सुरु असून, रविवार सायंकाळपासूनच पोलिस प्रशासन आणि मंदिर ट्रस्ट पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले होते. यंदा संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला कोणताही त्रास किंवा गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर ट्रस्ट आणि प्रशासन संयुक्तपणे सर्व सुख-सुविधा पुरवत आहे. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी योग्य प्रवेश आणि निर्गमनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली. मंदिराचे अध्यक्ष कुणाल दांडगे यांनी सांगितले की, सुविधा पुरवण्यासाठी मंदिर प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.

स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने वेरूळ येथील जर्नादन स्वामी मठात श्रावण सोमवारच्या औचित्याने ‘सहस्त्र लिंगार्चन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात हा सोहळा झाला.पर्जन्यसूक्त पठण आर्वजून याठिकाणी करण्यात आले. यंदा भाविकांच्या येण्यासाठी एक स्वतंत्र रस्ता आणि पूर्वेकडून बाहेर पडण्यासाठी नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनासाठी जास्त वेळ लागणार नाही. प्रशासनाच्या माहितीनुसार यंदा साधारण एका तासात दर्शन होत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतले होते, तर रात्री पर्यंत ही संख्या ८० हजारांवर पोहोचली होती. श्रावणात पावसाची शक्यता लक्षात घेऊन भाविकांसाठी लावण्यात आलेल्या नागमोडी बॅरिकेडिंगमध्ये मंदिर प्रशासनाकडून मंडप आणि ताडपत्री लावण्यात आली आहे. पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे, पावसापासून भाविकांचे संरक्षण होईल. सोलापूर-धुळे हायवेवर व लेण्यांजवळ स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली होती. भाविकांच्या आरोग्यासाठी मंदिर परिसरात ‘आपला दवाखाना’ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही भाविकाला त्रास झाल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा देण्यासाठी पथक सज्ज आहे. दरम्यान, आज मनसे नेते अमित ठाकरे यांनीही श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *