![]()
धनगरवाडी-दिघी शिवारात सुरू असलेल्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची मंगळवारी ( २५ ऑगस्ट) सांगता होत आहे. सांगता सोहळ्यासाठी सुमारे १० लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यांच्या प्रसादासाठी ५०० पोती साखरेची बुंदी तयार केली जात आहे. प्रसाद वाटपासाठी ३५० ट्रॅक्टर आणि १५ हजार स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे. बुंदी तयार करण्यासाठी मोठा भटारखाना उभारण्यात आला आहे. त्यात ३५ कढायांची व्यवस्था आहे. काल्याच्या प्रसादासाठी ७०० पोती मुरमुरे व २० क्विंटल शेंगदाणे उपलब्ध करण्यात आले आहेत. चिवडा तयार करण्यासाठी आरएमसी मिक्सर ट्रकचा वापर करण्यात येत आहे. स्वच्छतेसाठी येवला परिसरातील ४०० स्वयंसेवक कार्यरत आहेत. सोमवारी एकादशीनिमित्त ५०० क्विंटल साबुदाणा खिचडी तयार करण्यात आली. भटारखान्यात ४०० मजूर दररोज १० ते १२ तास काम करत आहेत. दररोज ५ लाख लिटर आमटी व भाकरीचा प्रसाद भाविकांना देण्यात आला. दरम्यान, सप्ताहस्थळी भक्तांशी संवाद साधताना जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोहत्या रोखण्यासाठी कठोर शासनाची गरज व्यक्त केली. अमली पदार्थांपासून गाव, घर आणि समाजाला मुक्त करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. सप्ताहामुळे विविध जाती-धर्मातील समाज एकत्र येत असून सामाजिक परिवर्तनाला चालना मिळते, असे ते म्हणाले. महंत रामगिरीजी महाराज यांनी अध्यात्म, संस्कृती आणि सदाचाराचे महत्त्व सांगितले. पूर्वजांच्या संस्कृतीचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य असून, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सदाचार व मनुष्यत्वाचे संस्कार देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कर्तव्य बजावताना केलेली सेवा हीच भगवंताची पूजा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगता सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक आमदार-खासदार उपस्थित राहणार आहेत. खासदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार रमेश बोरनारे, विठ्ठलराव लंघे, अमोल खताळ, हेमंत ओगले, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आदींनी सप्ताहस्थळी भेट दिली. बुंदी तयार करण्यासाठी भटारखान्यात ३५ कढायांची व्यवस्था केली आहे. इन्सेट : तयार झालेली बुंदी. यंदा १७९ वा सप्ताह होत आहे. या सप्ताहाची दुसऱ्या शतकाकडे वाटचाल सुरू आहे. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, महंत नारायणगिरीजी महाराज यांनी सुरू केलेली ही परंपरा महंत रामगिरीजी महाराज पुढे नेत आहेत. काही वर्षांत द्विशतक पूर्ण करणारा हा देशातील एकमेव सप्ताह ठरेल, असा विश्वास पालकमंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
Source link
भक्तीचा महासागर:दहा लाख भाविकांची सेवा; 500 पोती बुंदी, 350 ट्रॅक्टर अन् 15 हजार सेवेकरी सज्ज!, १७९ व्या गंगागिरी महाराज सप्ताहाची आज सांगता