Headlines

मुलींनी योग्य आहारासोबत मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यावे- डॉ. कळंबे:लालबहादूर शास्त्री विद्यालयात विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन‎




लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शिवणी रसूलापूर येथे श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीतर्फे सुदृढ मुलगी, सक्षम भारत उपक्रमातंर्गत विद्यार्थिनींच्या वाढत्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांना योग्य आरोग्य मार्गदर्शन व उपचार मिळावेत, या उद्देशाने आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी निमा अध्यक्ष तसेच श्री आयुर्वेदिक क्लिनिक, पंचकर्म सेंटरचे डॉ. प्रेमादेवी काळमेघ, श्री शिवाजी सायन्स कॉलेज येथील रसायनशास्त्र विभागा तर्फे प्रा. डॉ.एन. ए. कळंबे, प्रा. डॉ. व्ही. बि. खोबरागडे, प्राचार्य विनय काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. काळमेघ यांनी विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करून त्यांच्या विविध आरोग्यविषयक समस्यांबाबत प्रमुख मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुलींमध्ये आढळणाऱ्या आरोग्य समस्या, त्यांची कारणे, योग्य आहार, वैयक्तिक स्वच्छता आणि वेळेवर आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच डॉ. कळंबे यांनी महिलांच्या आरोग्याचे महत्त्व विशद केले. महिलांचे आरोग्य हे कुटुंबाच्या तसेच समाजाच्या आरोग्याशी निगडित असून, विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य आहार, नियमित व्यायाम, स्वच्छता आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. खोबरागडे यांनी योगासने व प्राणायामाचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावत नियमित योगासने व प्राणायाम केल्याने शरीर निरोगी राहण्यासोबतच मन प्रसन्न व तणावमुक्त राहण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थिनींनी दैनंदिन जीवनात योग व प्राणायामाचा समावेश करावा, असा संदेश देण्यात आला. निरोगी महिला ही कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उभारणीतील महत्त्वाची शक्ती आहे. देशाच्या विकासात आणि उभारणीत महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, आजच्या विद्यार्थिनी उद्याच्या सक्षम महिला बनणार आहेत. त्यामुळे शिक्षणाबरोबरच आरोग्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकास यांनाही महत्त्व दिले पाहिजे, असे प्रा. विनय डी. काळे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोज सपकाळ यांनी केले, तर सुकेशिनी मोटघरे यांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *