Headlines

चांदूर रेल्वे स्टेशनचा कायापालट करा; समिती आक्रमक:खासदार अमर काळे, आमदार प्रताप अडसड यांना साकडे




येथील रेल्वे स्टेशनची दुरुस्ती आणि प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्था आणि प्रमुख एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीसाठी ‘रेल रोको कृती समिती’ आक्रमक झाली आहे. समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वाखाली खासदार अमर काळे आणि आमदार प्रताप अडसड यांना निवेदनही देण्यात आले आहे. नागपूर-भुसावळ रेल्वे मार्गावरील चांदूर रेल्वे स्टेशनवर या शहरासह परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, कर्मचारी रेल्वे प्रवासासाठी अवलंबून आहेत. मात्र, स्टेशनवर अनेक आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. परिणामी सर्व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे स्टेशनची इमारत व परिसरातील आवश्यक दुरुस्ती करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, स्वच्छ व सुरक्षित वेटिंग हॉल उभारावा, दोन्ही प्लॅटफॉर्मवर पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, आधुनिक कोच इंडिकेटर बसवावेत तसेच प्लॅटफॉर्मची उंची नियमानुसार वाढवावी, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. याशिवाय ११२०३-११२०४ नागपूर-मडगाव एक्सप्रेस तसेच १२४०५ -१२४०६ भुसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना सुपरफास्ट एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना चांदूर रेल्वे स्टेशनवर नियमित थांबा देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्टेशनवर आरपीएफची नियमित व पुरेशी सुरक्षा व्यवस्था करावी आणि स्टेशन परिसरातील आवश्यक ठिकाणी आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, हेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चांदूर रेल्वे हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असूनही येथे आवश्यक प्रवासी सुविधा उपलब्ध नसणे ही बाब दुर्दैवी आहे. त्यामुळे सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडे प्रभावी पाठपुरावा करावा, आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा आणि कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी नितीन गवळी यांच्यासह मेहमूद हुसेन, विनोद जोशी, सतीश चौधरी, अजय हजारे, अमोल देशमुख, विनोद लहाने, मंगेश डाफ, हर्षल वाघ, सुमेध सरदार आदींची उपस्थिती होती. रात्रीच्या वेळी सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शिवाजी महाराज नगर परिसरातील भूमिगत मार्गाचे काम दीर्घकाळापासून अपूर्ण असून ते तातडीने पूर्ण करण्यात यावे. या मागणीचा यापूर्वीही पाठपुरावा करण्यात आला असल्याचे समितीने स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *