Headlines

दुर्लक्ष:असदगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी‎विहिंप अन् बजरंग दल आक्रमक‎, अवैध प्रकारांना आळा घाला, हिंदुत्ववाद्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी‎




शहरातील ऐतिहासिक असदगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सोमवारी विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांनी किल्ल्याची पाहणी केली. किल्ला परिसरातील अतिक्रमणे, अस्वच्छता, अवैध प्रकारांना आळा घालण्याची मागणी हिंदुत्ववाद्यांकडून करण्यात आली. अकोल्यात ऐतिहासिक असदगड किल्ला आहे. मात्र किल्ला परिसराची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी दगड, माती पडत आहे. परिसरही अस्वच्छ असतो. किल्ला संवर्धनासह परिसराच्या सुशोभीकरणाची मागणी नागरिकांकडून झाली. दरम्यान सोमवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने किल्ला संवर्धनासह अन्य सुविधांसाठी जिल्हाधिकारी वर्षा मिना यांना निवेदन केले. निवेदनाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी असदगड किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पुरातत्त्व विभाग, महानगरपालिका, पोलिस विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. निवेदनाची तातडीने दखल घेत प्रत्यक्ष किल्ल्याची पाहणी केल्याने ऐतिहासिक असदगड किल्ल्याच्या संवर्धनाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे बजरंग दलाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी बजरंग दलाचे विदर्भ प्रांत सहसंयोजक- सुरज भगेवार, विभाग संयोजक हरिओम पांडे, जिल्हामंत्री निलेश पाठक, श्रेयस शांडिल्य, अमर कुकरेजा, पवन वाडेकर, राजेश उदापुरे, किशोर अलिमचंदानी, नंदकिशोर बोर्डे, तेजस राऊत, संतोष बुरडे, प्रदीप शुक्ला, धनंजय चांदवडकर, मनोज अहिर, पदाधिकारी उपस्थित होते. समाजकंटकांकडून किल्ल्यावर दारूचे सेवन, गांजासारख्या अमली पदार्थांचा वापर, अश्लील वर्तन, इतर गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारीही विहिंप व बजरंग दलातर्फे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूच्या सुरक्षिततेबरोबरच परिसरातील नागरिक, पर्यटक व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. किल्ला परिसरात अवैध धंदे, बेकायदेशीर प्रकारांना प्रतिबंध करणे, रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, परिसरात योग्य प्रकाशव्यवस्था करणे, नियमित स्वच्छता राखणे या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *