![]()
जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यानंतरची काल्पनिक वेतनवाढ देण्याबाबत छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल दिला. सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने मिळालेली ही काल्पनिक वेतनवाढ हे न्यायालयीन यश असून, भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे अॅड. शिवकुमार मठपती यांनी सांगितले. या न्यायालयीन लढ्यात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रभावी बाजू मांडल्याबद्दल अॅड. मठपती यांचा देवगड येथे भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर होते. बन्सीभाऊ आगळे, साधना पुरकर, भाऊसाहेब पटारे व प्रमोद देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अॅड. मठपती यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अॅड. मठपती म्हणाले, न्यायालयीन निर्णयाला शासन निर्णयाची जोड मिळणे आवश्यक आहे. यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मंत्रालयीन स्तरावर एकजूट दाखवून शासन निर्णय मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. शासन निर्णय झाल्यास या निकालाचा लाभ सर्व पात्र सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळू शकतो. यावेळी त्यांनी उपस्थितांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन शंकांचे समाधान केले. राजेंद्र मोरगे, कृष्णा शिंदे, बन्सी आगळे व भाऊसाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या निर्णयाचा लाभ उर्वरित पात्र कर्मचाऱ्यांनाही मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमास नेवासे, श्रीरामपूर, राहाता, श्रीगोंदे, कोपरगाव व राहुरी तालुक्यांतील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अॅड. शिवकुमार मठपती यांचा देवगड येथे सत्कार करण्यात आला.
Source link
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ‘काल्पनिक वेतनवाढी’ला न्यायालयीन बळ:ॲड. शिवकुमार मठपती यांचा देवगड येथे सत्कार