![]()
कोणतेही ऑपरेशन हे त्याच्या आवश्यकतेनुसारच करायचे असते. मला पक्के ठाऊक आहे की कोणते ऑपरेशन केव्हा करायचे. त्यामुळे कोणीही चिंता करण्याचे कारण नाही, योग्य वेळी योग्य ‘सर्जरी’ होईल आणि त्याचे परिणामही सर्वांना दिसतील, अशा शब्दांत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरला मिश्किल टोला लगावला. तसेच, वारकरी संप्रदायावरून सुरू असलेल्या वादात उडी घेत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) संप्रदायाला बदनाम करत असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला. सोलापूर जिल्ह्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली आहे. या प्रवेश सोहळ्यात भालके यांनी जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, ‘ऑपरेशन लोटस’ थंडावले आहे का? असा प्रश्न विचारला असता गोरे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय विरोधकांना सूचक इशारा दिला. राजकारणात वेळ महत्त्वाची असते, आणि आमची शस्त्रक्रिया कधी करायची हे आम्हाला माहित आहे, असे म्हणत त्यांनी आगामी काळात मोठ्या राजकीय उलटफेरचे संकेत दिले आहेत. वारकरी संप्रदायाचा अपमान खपवून घेणार नाही दुसरीकडे, वारकरी संप्रदाय आणि शरद पवार गट यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरही पालकमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली. खासदार शरद पवार यांनी संप्रदायात ‘प्रतिगामी शक्ती’ शिरल्याचे विधान केले होते, त्यानंतर पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह अनेक वारकरी नेत्यांवर सोशल मीडियातून टीका केली होती. पवार गटाने बदनाम करू नये याचा निषेध करत जयकुमार गोरे म्हणाले, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा मानबिंदू आणि आमचा अभिमान आहे. राजकीय स्वार्थासाठी या पवित्र परंपरेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. संप्रदायाची स्वतःची एक स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यात आपली राजकीय विचारधारा घुसवून त्याला डाग लावण्याचे काम पवार गटाने थांबवावे. ..तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार दरम्यान, विकास लवांडे यांच्या विधानामुळे वारकरी संप्रदाय प्रचंड आक्रमक झाला आहे. पंढरपूर येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत लवांडे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. शासनाने कारवाई न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वारकरी संप्रदायाने दिला आहे. आता पालकमंत्र्यांनी या वादात थेट भूमिका घेतल्याने हा वाद राजकीय पटलावर अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Source link
कोणतं ऑपरेशन कधी करायचं हे मला ठाऊक:जयकुमार गोरेंचा सोलापुरात शिवसेनेला टोला, म्हणाले- शरद पवार गटाने वारकरी संप्रदायाला बदनाम करू नये