Headlines

चारनेरवाडी शिवारात वन्यप्राण्यांनी रातोरात फस्त केले मक्याचे पीक




सिल्लोड तालुक्यातील चारनेरवाडी शिवारात वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. गट क्रमांक १२ मधील महिला शेतकरी मालनबाई तेजराव चौथमल यांच्या एक एकर क्षेत्रावरील बहरलेले मक्याचे संपूर्ण पीक वन्यप्राण्यांनी रातोरात फस्त केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चौथमल यांचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मालनबाई यांनी यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या आशेने एक एकरावर मक्याची लागवड केली होती. पीक काढणीच्या तोंडावर असताना रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांनी शेतात शिरून संपूर्ण मका उद्ध्वस्त केली. सकाळी शेतात गेल्यावर संपूर्ण पीक जमिनीदोस्त झाल्याचे दिसताच चौथमल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव सातत्याने वाढत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतीवरच उदरनिर्वाह अवलंबून असताना ऐन हंगामात पीक नष्ट झाल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. वनविभागाने या घटनेची त्वरित दखल घेऊन नुकसानीचा पंचनामा करावा आणि नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मालनबाई चौथमल यांनी केली आहे. तसेच वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *