![]()
राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या वर्षभरात त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान या निर्णयाचा समाचार घेत फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. ‘यूपीच्या निवडणुकांसाठी निर्णय’ अमित ठाकरे यांनी राज्य सरकारच्या या निर्णयामागे राजकीय स्वार्थ असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “सरकारने यांना थेट १०-१५ वर्षे मराठी शिकण्यासाठी मुदत द्यायला हवी होती. आम्हाला तुमची मराठीबद्दलची आपुलकी समजली आहे. आता उत्तर प्रदेशात निवडणुका येणार आहेत, केवळ म्हणूनच ही मुदतवाढ दिली जात आहे. सरकारने एखाद्या भूमिकेवर ठाम राहायला हवे. हा निर्णय आम्हाला अजिबात मान्य नाही.” ‘हिंदी बोलल्यास बदडून काढू’ मराठी भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक होत अमित ठाकरे यांनी अमराठी चालकांना थेट इशारा दिला. “जर एखादा रिक्षाचालक प्रवाशांशी उद्धटपणे वागत असेल, तर आम्ही त्याला बदडून काढू. यूपीची भाषा किंवा हिंदीच बोलली पाहिजे, हे लोकांना सांगू नका. आम्ही इथे मराठीच बोलणार,” असा इशारा त्यांनी दिला. ‘मराठी भाषेला बाजूला का ठेवता?’ इतर राज्यांचे उदाहरण देत ते पुढे म्हणाले, “फडणवीस साहेबांचे आपल्या राज्यावर आणि मराठीवर किती प्रेम आहे हे आता समजले आहे. तुम्ही गुजरात, पंजाब किंवा दक्षिणेकडील राज्यांमध्ये जा, तिथे प्रत्येक ठिकाणी लोकांना त्यांच्या मातृभाषेबद्दल प्रचंड आत्मीयता आहे. मग आपल्याच राज्यात, केवळ यूपीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून मराठी भाषेला बाजूला ठेवण्याची कोणती लाचारी तुमच्यावर ओढवली आहे?” असा सवालही अमित ठाकरे यांनी उपस्थित केला. हेही वाचा.. अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांना आता मराठीशिकण्यासाठी एक वर्ष मुदतवाढ- फडणवीस: उत्तर प्रदेश निवडणुका,बिहारच्या राजकारणामुळे फडणवीसांचे ‘डॅमेज कंट्रोल’ अमराठी रिक्षा, टॅक्सीचालकांना दैनंदिन संवादापुरती जुजबी मराठी शिकण्यासाठी राज्य सरकारने आता १ वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत भाषेच्या कारणावरून चालकांवर कोणतीही दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. महायुती समर्थक हाजी अराफत यांच्या नेतृत्वाखालील चालक संघटनांच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर हा दिलासा देण्यात आला. सविस्तर वाचा
Source link
मराठीपेक्षा सरकारला 'यूपी'च्या निवडणुका महत्त्वाच्या?:मुदतवाढीवरून अमित ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, चालकांना दिली मनसे स्टाईल कारवाईची धमकी