![]()
निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण कागदपत्रे असलेली गणना पत्रके अनधिकृतरीत्या ताब्यात बाळगून त्यांची झेरॉक्स काढल्याप्रकरणी रायगड जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी ३ हजार ४०० फॉर्म्सची झेरॉक्स काढणाऱ्या सूरज पाटील याच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ५ बीएलओ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. नेमके काय घडले? २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खारघर सेक्टर १९ येथील एका झेरॉक्स सेंटरवर निवडणूक आयोगाच्या गणना पत्रिकेची झेरॉक्स काढण्याचे काम चालू असल्याची गोपनीय तक्रार प्रशासनाला मिळाली. सूरज पाटील नामक गृहस्थ अनधिकृतरीत्या या फॉर्मची झेरॉक्स काढत असल्याचे समजताच, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तात्काळ सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना त्या झेरॉक्स सेंटरवर चौकशीसाठी पाठवले. ३४०० फॉर्म्स जप्त अधिकाऱ्यांनी झेरॉक्स सेंटरवर प्राथमिक चौकशी केली असता, सूरज पाटील याने तब्बल ३ हजार ४०० गणना पत्रके झेरॉक्ससाठी आणल्याचे उघडकीस आले. या सर्व गणना पत्रकांची पाहणी केली असता, ती एकूण ११ मतदान केंद्रांवरची असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये ५ मतदान केंद्रांवरील फॉर्म्सची संख्या सर्वाधिक होती, तर उर्वरित ६ मतदान केंद्रांवरचे केवळ एकेक गणना पत्रक होते. सूरज पाटीलवर FIR, तर ५ BLO निलंबित ही गणना पत्रके अनधिकृतरीत्या स्वतःच्या ताब्यात बाळगणे आणि त्यांची झेरॉक्स काढणे हे भारतीय कायद्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ खारघर पोलीस ठाण्यात सूरज पाटील याच्या विरोधात ‘भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियम’ आणि ‘भारतीय न्याय संहिते’च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याशिवाय, ज्या ५ बीएलओं (BLO) च्या दप्तरामधून १०० पेक्षा जास्त फॉर्म्स अनधिकृतरीत्या बाहेर हस्तांतरित झाले होते, त्या पाचही बीएलओंना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यांच्यावर पुढील शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाणार आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. खारघर SIR फॉर्म प्रकरणावरून विजय वडेट्टीवार आक्रमक खारघरमधील खासगी झेरॉक्स दुकानात हजारो SIR गणना पत्रके आढळल्याच्या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार आणि निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. अधिकृत कागदपत्रे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याकडे कशी पोहोचली, असा सवाल करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. मतदारांच्या गोपनीय माहितीचे संरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सांगत, दोषींवर तसेच या प्रकरणामागील सूत्रधारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. प्रशासनाने केवळ मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. हेही वाचा.. मुख्यमंत्री फडणवीस बिगरमराठा असल्यानेच जरांगेंचा जातीय आकस:जरांगे हे उपमुख्यमंत्री शिंदेंचे सेवक; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक आरोप मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे राजकीय हेतू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिगरमराठा समाजातील असल्याने त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. तसेच जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटी किंवा मुंबईतील आझाद मैदान, अशा कोणत्याही ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे. सविस्तर वाचा
Source link
प्रशासनाचा दणका!:3400 निवडणूक गणना पत्रके परस्पर झेरॉक्स करणाऱ्या सूरज पाटीलवर गुन्हा दाखल; 5 BLO निलंबित