Headlines

शेवगाव:वृक्षांना राख्या बांधून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश




रक्षाबंधन हा केवळ बहीण-भावाच्या प्रेमाचा आणि संरक्षणाच्या वचनाचा सण न राहता निसर्गाशी असलेले आपले नाते दृढ करण्याचा संदेश देणारा ठरला. तालुक्यातील शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वड, पिंपळ, कडुनिंब, अशोक आदी वृक्षांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. ‘वृक्षांचे रक्षण करा, वृक्ष आपले रक्षण करतील’ हा संदेश विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून दिला. यावेळी ढोरसडे ग्रामपंचायतीच्या सदस्या छाया माळवदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या अंजली चिंतामण होत्या. पर्यवेक्षक पोपट खताळ यांच्यासह शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी विद्यालयातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांना आणि परिसरातील वृक्षांनाही राख्या बांधल्या. वृक्षांना राखी बांधण्यामागील उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थिनींनी वृक्ष हे केवळ निसर्गाचे सौंदर्य नसून मानवाच्या जीवनाचा आधार असल्याचे सांगितले. झाडांमुळे प्राणवायू मिळतो. वातावरणातील उष्णता कमी होते. मातीची धूप रोखली जाते. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते आणि असंख्य पक्षी, कीटक व जीवजंतूंना आश्रय मिळतो. त्यामुळे वृक्षतोड रोखून अधिकाधिक वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. सहशिक्षिका अनिता दारकुंडे यांनी रक्षाबंधनाचे सांस्कृतिक व भावनिक महत्त्व विशद केले. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. राखी ही केवळ धाग्याची नसून प्रेम, विश्वास, आपुलकी आणि संरक्षणाच्या जबाबदारीची प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्या अंजली चिंतामण यांनी नारळी पौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले. वृक्ष आपल्याला जीवन देतात; त्यामुळे त्यांचे संगोपन करणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करणे होय, असे त्यांनी सांगितले. राखीचा मान राखत बहिणींचे रक्षण करण्याबरोबरच वृक्ष आणि पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचेही स्मरण करण्यात आले. सैनिकांमुळे देश सुरक्षित आहे, त्याचप्रमाणे वृक्षांमुळे पर्यावरण सुरक्षित राहते, असा भावनिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा शेळके यांनी केले. प्रतीक्षा आजबे यांनी प्रास्ताविक केले. संध्या नवले यांनी अध्यक्षीय सूचना, प्रतीक्षा धुमाळ यांनी अनुमोदन, तर श्रावणी सामृत यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *