![]()
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या हजारो कोटींच्या विकासकामांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. एकाच वेळी शहरात अनेक विकासकामे सुरू असल्याने नाशिककरांना सध्या मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकांच्या शिव्याही खाव्या लागत आहेत, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. मात्र, ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर हेच लोक आपल्याला फुलांचे हार घालतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, कुंभमेळ्यातील कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करणारे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही त्यांनी जोरदार पलटवार केला. नाशिकमध्ये आयोजित ‘सिंहस्थ महा कुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमात ते बोलत होते. विकासकामे करताना दोन शिव्या खायची तयारी ठेवा नाशिकमध्ये सुरू असलेल्या कामांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “सध्या एकाच वेळी रस्त्यांची कामे, रिंगरोड आणि रुंदीकरण सुरू असल्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या लोकांना त्रास होतोय. त्यामुळे लोकांच्या शिव्या आम्हाला खाव्या लागतात. गिरीश महाजन आणि दादा भुसे इथेच राहत असल्याने त्यांना तर जास्त शिव्या खाव्या लागतात.” “कोणतेही मोठे परिवर्तन करताना सुरुवातीला शिव्या खाव्याच लागतात. पण ज्या दिवशी ही कामे पूर्ण होतील, त्र्यंबकेश्वरचा कॉरिडॉर उभा राहील, तेव्हा हेच लोक आपल्याला फुलांचे हार घालतील आणि आपली तारीफ करतील. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी दोन शिव्या खायची तयारी ठेवावी; फक्त आपले काम जनहिताचे आणि पारदर्शक असले पाहिजे.” “काही लोक विचारतात की कुंभमेळ्यावर ३४ हजार कोटी रुपये का खर्च करताय? त्यांना हे समजत नाही की यातील ९० टक्के निधी हा कायमस्वरूपी व्यवस्थांवर खर्च होत आहे. यातून पुढच्या ५० वर्षांसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आधुनिक सुविधा निर्माण होणार आहेत.” साधुग्रामच्या जागांचे अधिग्रहण “दर 12 वर्षांनी कुंभमेळ्यावेळी साधुग्रामसाठी जागांचा प्रश्न निर्माण होतो. जर आता या जागा अधिग्रहित केल्या नाहीत, तर भविष्यात कुंभमेळा कुठे करायचा हा प्रश्न उभा राहील. म्हणूनच अडीच हजार कोटी रुपये खर्च करून साधुग्रामच्या जागा कायमस्वरूपी अधिग्रहित करण्याचा मोठा निर्णय आम्ही घेतला आहे.” पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार कुंभमेळ्याच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत पृथ्वीराज चव्हाण यांनी खर्चाचा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली होती. याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “कुंभमेळ्याचे सर्व प्रकल्प जाहीर आहेत, यात लपवलेले काहीच नाही. सर्व माहिती ‘पब्लिक डोमेन’मध्ये उपलब्ध आहे, त्यांनी ती तपासून पाहावी.” “ज्यांच्या मनात आणि आचरणात भ्रष्टाचार आहे, त्यांनाच सगळीकडे भ्रष्टाचार दिसतो. ज्या ज्या ठिकाणी सनातन आणि हिंदू आस्था आहे, त्या ठिकाणी असे खोटे आरोप करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याची काहींची स्ट्रॅटेजी आहे. पण ‘ये पब्लिक है, ये सब जानती है’,” असा टोला त्यांनी लगावला. ‘भारतीय सनातन विचार हाच विज्ञाननिष्ठ विचार’ कार्यक्रमात सनातन संस्कृतीचे महत्त्व सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, “आमची संस्कृती आणि सभ्यता जगातली सर्वात जुनी आणि प्रगत आहे. युरोपसारखे देश जेव्हा अश्मयुगात (Stone Age) होते, तेव्हा आमच्याकडे उत्तम स्थापत्यशास्त्र, पाणी निचरा व्यवस्था आणि धातूशास्त्रावर काम करणारे कारखाने होते.” “अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘सूर्य सिद्धांता’त पृथ्वी आणि सूर्याचे अंतर, सौरमंडळाची रचना अचूकपणे मांडली आहे. सुश्रुत संहितेने जगाला पहिली शल्यचिकित्सा शिकवली आणि पाणिनीने जगातील सर्वात जुने व्याकरण दिले. आमची संस्कृती पुण्य पुरातन असूनही नित्य नूतन आहे, आणि महाकुंभ हा त्याच सनातन संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण सिंहस्थ महाकुंभाच्या तयारीचा औपचारिक टप्पा पुढे नेत 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. साधुसंत, आखाडे आणि विविध भक्ती परंपरांच्या सहभागातून हा कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कितीही अडचणी आल्या तरी सिंहस्थ महाकुंभ यशस्वी करण्यासाठी सरकार पूर्ण ताकदीने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकीकडे कुंभमेळ्याच्या तयारीमुळे सध्या नाशिककरांना वाहतूक आणि इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे सरकारकडून कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारण्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात ही कामे किती वेगाने आणि पारदर्शकपणे पूर्ण होतात, तसेच नागरिकांना दिलासा कधी मिळतो, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… मनोज जरांगे पाटील यांचे 3 वर्षांतील 11 वे उपोषण आजपासून: जालन्यातील 1700 पोलिसांच्या सुट्या रद्द, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याची नवी मागणी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत आमरण उपोषणास बसत आहेत. ३ वर्षांतील त्यांचे हे ११ वे आंदोलन आहे. जालन्यातील सर्व १७०० पोलिसांच्या सुट्या २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान रद्द केल्या आहेत. आरक्षणासोबत विद्यार्थ्यांना सवलती, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याची नवी मागणी आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
कुंभमेळ्याच्या तयारीवर फडणवीसांचा मोठे विधान:नाशिककरांच्या सध्या शिव्या खाव्या लागतायत, पण कामं पूर्ण झाल्यावर हेच लोक हार घालतील; पृथ्वीराज चव्हाणांवरही पलटवार