मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटीत मोठी तयारी करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी
.
या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “मी जरांगेला भाव देत नाही. जरांगेंच्या नादाला लागायचं ते ज्याचं त्याचं, पण ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये,” असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.
ओबीसींच्या वाट्याचं कोणालाही देऊ नका
पत्रकारांनी मनोज जरांगे यांच्या आगामी उपोषणाबाबत प्रश्न विचारला असता विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका मांडली. जरांगे यांनी सरकारविरोधात आंदोलन करावे किंवा सरकारने त्यांच्याशी चर्चा करावी, याच्याशी आपल्याला काही देणे-घेणे नसल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. मात्र, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. “मी जरांगेला भाव देत नाही. आम्हाला काही देणं-घेणं नाही. आमच्या वाट्याचं देत असताना कुणालाही देऊ नये,” असे वडेट्टीवार म्हणाले. मराठा आरक्षणासाठी ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यास वडेट्टीवार यांनी स्पष्ट विरोध केला. ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण देण्याऐवजी सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.
50 टक्क्यांची मर्यादा आधीच ओलांडली
आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच ईडब्ल्यूएसचे 10 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आता आरक्षणाची मर्यादा 60 टक्क्यांपर्यंत गेल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. “ओबीसींच्या वाटचं घेऊ नये. द्यायचंच असेल तर ईडब्ल्यूएससाठी जसं 10 टक्के आरक्षण दिलं, तसं आणखी वाढवा. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. आता 60 टक्क्यांवर गेली आहे. पुन्हा 40 टक्के वाढवा आणि अ, ब, क, ड काढून टाका,” असे वडेट्टीवार यांनी म्हटले. यातून ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी त्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जरांगेंच्या नादाला लागायचं ते ज्याचं त्याचं
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला. जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे की नाही, हा संबंधितांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “जरांगेंच्या नादाला लागायचा तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये, हा आमचा प्रश्न आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मनोज जरांगे यांच्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या तापण्याची शक्यता आहे.
अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र
याचवेळी विजय वडेट्टीवार यांनी आणखी एक दावा केला. अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, सध्या वातावरण तापलेले असल्याने संबंधितांची नावे जाहीर करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “ओबीसी प्रमाणपत्र असलेले खूप मराठा नेते आहेत. मात्र, आता बोलणे योग्य नाही. सध्या वातावरण गरम आहे. वातावरण थंड होऊ द्या, सगळ्यांची नावे देतो,” असे वडेट्टीवार यांनी सांगितले. वडेट्टीवार यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी कोणत्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.
भाजप आमदाराकडूनही जरांगे लक्ष्य
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून भाजपचे तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांनीही टीका केली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाचा मूळ उद्देश मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा राजकीय नेत्यांना लक्ष्य करणे आणि स्वतःचे नाव मोठे करणे हा असल्याचा आरोप त्यांनी केला. रहांगडाले यांच्या मते, “मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश फक्त भाजप नेत्यांना खाली दाखवणे, शिव्या देणे आणि स्वतःचे नाव मोठे करणे हाच राहिलेला आहे.” स्वतःच्या हितासाठी आणि स्वार्थासाठी हे आंदोलन चालवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात होण्यापूर्वीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आंतरवाली सराटीत
दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. 29 ऑगस्टपासून जरांगे आमरण उपोषण सुरू करणार असल्याने त्याआधी पंडित यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
सरकारसमोर पुन्हा आरक्षणाचा पेच
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कुणबी प्रमाणपत्र, जात पडताळणी आणि ओबीसी आरक्षणातील हक्क यावरून मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये आधीपासूनच मतभेद आहेत. आता जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसल्याने सरकारसमोर या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. एकीकडे जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर दुसरीकडे वडेट्टीवार यांच्यासारखे ओबीसी नेते ओबीसी आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागू नये, अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या जरांगे यांच्या उपोषणादरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…
मनोज जरांगे पाटील यांचे 3 वर्षांतील 11 वे उपोषण आजपासून: जालन्यातील 1700 पोलिसांच्या सुट्या रद्द, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याची नवी मागणी

मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत आमरण उपोषणास बसत आहेत. ३ वर्षांतील त्यांचे हे ११ वे आंदोलन आहे. जालन्यातील सर्व १७०० पोलिसांच्या सुट्या २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान रद्द केल्या आहेत. आरक्षणासोबत विद्यार्थ्यांना सवलती, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याची नवी मागणी आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
मुख्यमंत्री फडणवीस बिगरमराठा असल्यानेच जरांगेंचा जातीय आकस: जरांगे हे उपमुख्यमंत्री शिंदेंचे सेवक; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक आरोप

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे राजकीय हेतू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिगरमराठा समाजातील असल्याने त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. तसेच जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटी किंवा मुंबईतील आझाद मैदान, अशा कोणत्याही ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी