![]()
आठवडी बाजारात महिला बचत गटांनी तयार केलेले उत्कृष्ट दर्जाचे घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, सेंद्रिय भाजीपाला तसेच दैनंदिन वापरातील विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांना थेट ग्राहक मिळवून देणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महिलांना मिळणार हक्काची बाजारपेठ शेखर स्वामी | करमाळा महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांना स्थानिक पातळीवर हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी करमाळा नगर परिषदेतर्फे महिला बचत गट आठवडी बाजाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला. दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून, माजी आमदार जयवंतराव नामदेवराव जगताप सामाजिक सभागृह, किल्ला वेस, करमाळा येथे या बाजाराचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला गायकवाड, मुख्याधिकारी सचिन तपसे, श्रद्धा तपसे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका यांच्या उपस्थितीत झाले. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी महिला बचत गटांच्या विविध स्टॉलला भेट देऊन तेथील उत्पादनांची पाहणी केली तसेच काही वस्तूंची खरेदी करून महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले. बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांना थेट ग्राहक मिळाल्याने महिला उद्योजकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महिलांच्या हाताला काम, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ आणि कुटुंबाला आर्थिक आधार देणारा हा उपक्रम करमाळा शहरातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. याप्रसंगी प्रियांका गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्षा व नगर परिषद प्रशासनाने महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच शहरातील सर्व महिला बचत गटांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यशोदा परदेशी यांनी नगर परिषद प्रशासनाचे आभार मानले. या कार्यक्रमास नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, महिला व बालकल्याण समितीचे पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, शहर स्तर संघाचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिला बचत गटांच्या सदस्या उपस्थित होत्या. यावेळी नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी शहरातील बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात शहरातील महिलांनी तयार केलेल्या पदार्थ व वस्तूंना अधिक व्यापक बाजारपेठ मिळावी यासाठी ‘उद्योग भवन’ निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
Source link
सक्षमीकरण:महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मिळणार नवी दिशा