Headlines

डोंगराळेतील 'त्या' चिमुरडीला अखेर न्याय:बालिकेवरील बलात्कार अन् खूनप्रकरणी नराधम विजय खैरनारला फाशीची शिक्षा; मालेगाव न्यायालयाचा निकाल




अवघ्या महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील अवघ्या साडेचार वर्षांच्या चिमुकल्या बालिकेवरील अमानुष लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खून खटल्यात न्यायालयाने अत्यंत कठोर व ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. मालेगाव अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने (फास्ट ट्रॅक कोर्ट) या विकृत गुन्ह्यातील दोषी नराधम आरोपी विजय ऊर्फ शेखर खैरनार (वय 24) याला थेट फाशीची (मृत्युदंडाची) शिक्षा ठोठावली आहे. या निकालाने संपूर्ण पीडित कुटुंबाला आणि न्यायासाठी आक्रोश करणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळाला असून, पीडितेच्या कुटुंबीयांना शासनाकडून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी दिली. अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला. न्यायालयाने यापूर्वीच आरोपी खैरनार याला अपहरण, बलात्कार (पोक्सो), पुरावे नष्ट करणे आणि निर्घृण खून या सर्व कलमांखाली दोषी ठरवले होते. शिक्षेच्या मुद्द्यावर झालेल्या सखोल युक्तिवादानंतर आज अखेर दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. रेअरेस्ट ऑफ रेअर गुन्हा; ॲड. उज्ज्वल निकम यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला निर्णायक जनतेचा तीव्र आक्रोश आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचे दाखले देत सुमारे 50 मिनिटे टोकदार युक्तिवाद केला. डोंगराळे गावातील लहान मुले आरोपी विजय खैरनार याला ‘दादा’ म्हणून संबोधत असत. खेळणाऱ्या लहान मुलांमध्ये पीडिता ही एकुलती एक निष्पाप मुलगी होती. त्या नात्याचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेऊन आरोपीने हे अमानवी कृत्य केले. विचारपूर्वक रचलेला कट 16 नोव्हेंबर रोजी ही बालिका इतर मित्रांसोबत खेळत असताना तिला चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपी घेऊन गेला. सुरुवातीला आपल्याला कोणी पाहिले आहे का, याची त्याने गावात चाचपणी केली. यावरून हे कृत्य भावनेच्या भरात नसून पूर्णपणे पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले असल्याचे ॲड. निकम यांनी सिद्ध केले. अमानुष अत्याचार व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न वैद्यकीय पुराव्यांवरून बालिकेवर अत्यंत क्रूर आणि गंभीर स्वरूपाचा लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली आणि मृतदेह मोबाईल टॉवरच्या तारेच्या कुंपणात फेकून देऊन पुरावे नष्ट करण्याचा घृणास्पद प्रयत्न केला गेला. या खटल्यात सरकारी पक्षाने एकूण 24 साक्षीदार तपासले. यामध्ये बालिकेसोबत खेळणाऱ्या एका 7 वर्षीय मुलाची साक्ष अत्यंत विश्वसनीय ठरली. तसेच, बालिकेला घेऊन जाताना पाहणाऱ्या एका स्थानिक महिलेची प्रत्यक्षदर्शी साक्ष आणि वैद्यकीय अहवाल यामुळे गुन्ह्याची साखळी अचूक जुळली. अवघ्या तीन आठवड्यांत आरोपपत्र; पोलिसांचा तत्पर तपास डोंगराळे येथील या घटनेनंतर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती. घटनेनंतर मालेगाव तालुका पोलीस ठाणे आणि तत्कालीन उपअधीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत आरोपी विजय खैरनारला बेड्या ठोकल्या. फास्ट ट्रॅक सुनावणी पोलिसांनी अवघ्या तीन आठवड्यांच्या आत न्यायालयात अत्यंत परिपूर्ण व ठोस दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. गेल्या 10 महिन्यांपासून या प्रकरणाची दैनंदिन पातळीवर जलदगती न्यायालयात सुनावणी सुरू होती. परिवीक्षाधीन अधिकारी, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह अधीक्षक आणि मानसोपचारतज्ज्ञांचे अहवालही न्यायालयात सादर करण्यात आले होते. पीडितेच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला पीडितेचे आई-वडील न्यायालयात हजर राहत होते. सुनावणीदरम्यान जेव्हा न्यायालयाने वडिलांना त्यांच्या भावना विचारल्या, तेव्हा त्यांचा अश्रूंचा बांध फुटला होता. “माझी मुलगी अजूनही ‘पप्पा’, ‘मम्मी’ अशी हाक मारते असा भास होतो. या नराधमाला फाशीच झाली पाहिजे,” अशी आर्त हाक त्यांनी दिली होती. आज न्यायालयाने विजय खैरनारला फाशीची शिक्षा सुनावताच पीडित कुटुंबीयांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. न्यायालयाच्या या निकालानंतर ॲड. उज्ज्वल निकम यांनी माहिती दिली की, शासनाच्या मनोधैर्य योजनेतून व न्यायालयीन आदेशांनुसार पीडितेच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त; निकालाचे राज्यभरातून स्वागत या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव सत्र न्यायालय परिसरात सकाळपासूनच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या खटल्यात सरकारी पक्षाला ॲड. संजय सोनवणे, ॲड. स्नेहा शर्मा-ठाकरे आणि ॲड. हर्षल तिवारी यांनी सहकार्य केले. निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झाल्याने समाजातील अशा विकृत प्रवृत्तींना जरब बसेल आणि या निकालामुळे कायद्यावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे, अशी प्रतिक्रिया न्यायालय परिसरातून व जनमानसातून व्यक्त होत आहे. —————————————————————— हेही वाचा… शेतकऱ्यांना 5 हजारांच्या मदतीने काय होणार?:दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी 1 लाख द्यायला पैसे का नाहीत? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल “महाराष्ट्रातील बळीराजा आज अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांत सापडून होरपळत आहे. शेतकऱ्यांची मागणी प्रतिहेक्टरी 1 लाख रुपयांच्या मदतीची असताना, सरकारने केवळ 5 हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे. 5 हजार रुपयांत आजच्या महागाईत खताचे दोन पोतेही येत नाहीत, मग शेतकऱ्याचा संसार कसा चालणार? जनतेचा विरोध असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे 1 लाख कोटी रुपये उपलब्ध आहेत, मग जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला हेक्टरी 1 लाख रुपयांचे साहाय्य द्यायला तिजोरीत खडखडाट का? सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये,” असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *