![]()
मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आटोपल्यानंतर झालेल्या वादातून 32 वर्षीय तरुणाचा दगडाने डोक्यात प्रहार करून खून करण्यात आल्याची घटना गोंदियात घडली. वडिलांशी झालेल्या धक्काबुक्कीचा राग मनात धरून त्यांच्या मुलाने तरुणावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना 28 ऑगस्टच्या मध्यरात्री अंगूरबगीचा रोडवरील मोहब हॉस्पिटलजवळ, एकदंत कॉलनी परिसरात घडली. या घटनेत मिथुन भैय्यालाल ठाकरे (32, रा. नवाटोला, पो. नागरा, ता. जि. गोंदिया) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचा भाऊ निलेश्वर भैय्यालाल ठाकरे यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संदीप देवदास मेश्राम (42, रा. कटंगीटोला, गोंदिया) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमक काय आहे प्रकरण मिळालेल्या माहितीनुसार, मिथुन ठाकरे हा मित्र रोहित उर्फ लल्ला विलास बसेना याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अवंती चौकात गेला होता. यावेळी त्याच्यासोबत प्रतीक मुन्ना मेश्राम, शहबाज बंदे शब्बीर खान पठाण आणि राहुल राजेश पारधी होते. चौकात वाढदिवसाचा केक कापल्यानंतर सर्वजण एकदंत कॉलनी परिसरात गेले. यानंतर मिथुन आणि रोहित हे देवदास मेश्राम यांच्या घरी गेले. तेथे दारू पित असताना 12:30 वाजण्याच्या सुमारास मिथुन आणि देवदास यांच्यात वाद झाला.वाद वाढल्यानंतर मिथुनने देवदास यांची कॉलर पकडून त्यांच्याशी धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. त्याने शिवीगाळही केल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार पाहिल्यानंतर देवदास यांचा मुलगा संदीप तेथे आला आणि त्याने मिथुनला घराबाहेर जाण्यास सांगितले. घरातून बाहेर पडल्यानंतरही मिथुन रस्त्यावरून जाताना शिवीगाळ करत असल्याचे सांगण्यात आले. वडिलांसोबत झालेल्या प्रकाराचा राग संदीपच्या मनात होता. त्यामुळे त्याने मिथुनचा पाठलाग केला. मिथुन पुढे जात असताना रस्त्याच्या कडेला पडलेला फरशीचा दगड संदीपने उचलला आणि त्याच्या डोक्यावर जोरात मारला. या हल्ल्यात मिथुनच्या कपाळाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर कोसळला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. भावाला मध्यरात्री फोन मिथुनचा भाऊ निलेश्वर हा त्यावेळी युनायटेड हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर होता. रात्री सव्वा एकच्या सुमारास त्याला राहुल नेवारे याचा फोन आला. मिथुनवर हल्ला झाल्याचे समजल्यानंतर निलेश्वर तातडीने घटनास्थळी पोहोचला. तेथे मिथुन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास रामनगर पोलिसांकडून सुरू असून आरोपी संदीप मेश्रामविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा.. मनोज जरांगे पाटील यांचे 3 वर्षांतील 11 वे उपोषण आजपासून:जालन्यातील 1700 पोलिसांच्या सुट्या रद्द, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याची नवी मागणी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत आमरण उपोषणास बसत आहेत. ३ वर्षांतील त्यांचे हे ११ वे आंदोलन आहे. जालन्यातील सर्व १७०० पोलिसांच्या सुट्या २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान रद्द केल्या आहेत. आरक्षणासोबत विद्यार्थ्यांना सवलती, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याची नवी मागणी आहे.सविस्तर वाचा..
Source link
वाढदिवसाच्या पार्टीनंतर रक्तरंजित थरार:वडिलांशी झालेल्या वादाचा राग, मुलाने मित्राच्या डोक्यात दगड घालून संपवले; गोंदियातील घटना