Headlines

मनोज जरांगे पाटलांचे 11वे आमरण उपोषण सुरू:म्हणाले- जीवघेणा लढा सुरू, तीन वर्षे वेळ दिला, आता अंमलबजावणीशिवाय माघार नाही




मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (शनिवार) आंतरवाली सराटी येथे आपले 11वे आमरण उपोषण सुरू केले आहे. “जीवघेणा लढा आता सुरू झाला आहे, अंमलबजावणी झाल्याशिवाय आता माघार घेणार नाही. सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर मुंबईला जाणार,” असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार, जात पडताळणी समिती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले. “सरकारच्या नियतीत खोट, मराठ्यांचे कल्याण होऊ द्यायचे नाही” मनोज जरांगे म्हणाले की, “दोन महिने, चार महिने करत सरकारने तीन वर्षे वेळकाढूपणा केला. आता आमच्या लक्षात आले आहे की सरकारच्या नियतीतच खोट आहे. त्यांना मराठ्यांच्या मुलाबाळांचे कल्याणच होऊ द्यायचे नाही. त्यामुळे आता सर्व मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही.” प्रदूषणाच्या नोटिशीवरून सरकारला टोला पोलिसांनी दिलेल्या प्रतिबंधात्मक नोटिशीवर बोलताना जरांगे म्हणाले, “वाहतुकीला अडचण होऊ नये म्हणून आम्ही स्वयंसेवक देतोय. यात प्रदूषणाचा उल्लेख असेल, तर गाड्या घेतल्यावर आणि सरकारचे जे काही सुरू आहे त्याने प्रदूषण होत नाही का? शेतकऱ्यांना, गोरगरीब जनतेला आणि ‘लाडक्या बहिणीं’ना पैसे देणार आहात, त्याने प्रदूषण होत नाही का? हे ‘सरकारी प्रदूषण’ आधी थांबवा.” “जात पडताळणी समिती कायमची बरखास्त करा” कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या वैधतेवर (Validity) बोलताना जरांगे यांनी जात पडताळणी प्रक्रियेवर मोठा आक्षेप घेतला. “तहसीलदार, एसडीएम (SDM) किंवा सक्षम अधिकारी सगळे पुरावे तपासूनच कुणबी प्रमाणपत्र देतात, मग पुन्हा जात पडताळणी कशासाठी? देशातील इतर राज्यांमध्ये अशी समिती नाही, मग ती फक्त महाराष्ट्रातच का?” “जात पडताळणी अधिकारी जाणुनबुजून मराठा मुलांची अडवणूक करतात. पैसे दिले की त्यांचे ‘कीस’ पडत नाहीत, नाही दिले की कागदपत्रांमध्ये मुद्दाम चुका काढल्या जातात. यामुळे लोकांचे हेलपाटे होतात आणि ऍडमिशन्स कॅन्सल होतात. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील ‘जात पडताळणी समिती’ कायमची बरखास्त करावी,” अशी मोठी मागणी त्यांनी केली. या निर्णयामुळे मराठाच नव्हे तर ओबीसी आणि एसटी प्रवर्गातील गरीब लोकांचेही कल्याण होईल, असे ते म्हणाले. मराठा समाजाला आवाहन- “आपली मुले अधिकारी बनवा” मराठा समाजाला भावनिक साद घालताना जरांगे पाटील म्हणाले, “आज प्रशासनात इतर जातींचे अधिकारी बसले आहेत, ज्यांना आपल्याबद्दल द्वेष आहे. अधिकारी हा जात विसरून सर्वांसाठी काम करणारा असावा, पण काही जणांच्या डोक्यात घाणेरडे विचार आहेत. त्यामुळे मराठा समाजाने आता शहाणे व्हावे, आरक्षण मिळवून आपली मुले प्रशासनात अधिकारी बनवा. तरच पुढच्या पिढीचे वाटोळे टळेल.” मुंबईची तारीख आणि पुढची दिशा मराठा क्रांती मोर्चाच्या ‘एसईबीसी (SEBC) आरक्षण टिकले पाहिजे’ या मागणीचे त्यांनी स्वागत करत ती योग्य भूमिका असल्याचे म्हटले. तसेच, सरकारकडून कोणी चर्चेला येणार का, या प्रश्नावर त्यांनी “आज संध्याकाळी ५ वाजता मुंबईला जाण्याबाबतचा आणि पुढील दिशा स्पष्ट करण्याचा निर्णय घेईन,” असे सांगितले. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी खालील ब्लॉग वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *