![]()
एमआयटी पुणे टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर (एमआयटी-टीबीआय) ने गेल्या दहा वर्षांत २० हून अधिक यशस्वी स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले आहे. या स्टार्टअप्सनी विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, एमआयटी-टीबीआय भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेला बळकटी देत आहे. एमआयटी-टीबीआयचे संचालक आणि एमआयटी समूहाचे संस्थापक प्रा. प्रकाश जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला अर्गेन टेक्नोव्हेशनचे साहिल नहार, अॅक्सी सोल्युशन्सचे सार्थवाह भोंडगे, सांटे फूड्सच्या ऋचा रोकडे, फिनट्रेस्टच्या आर्या कदम आणि रेअरमिंटचे मित मालपाणी उपस्थित होते. प्रा. जोशी यांनी एमआयटी-टीबीआयमधून विकसित झालेल्या काही यशस्वी स्टार्टअप्सची माहिती दिली. अर्गेन टेक्नोव्हेशनने जलद ईव्ही चार्जिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्याला ‘ईएफवाय पुणे ऑटो रिसर्च अँड डेव्हलपमेंट अवॉर्ड्स २०२६’ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, अॅक्सी सोल्युशन्सने स्मार्ट होम कंपोस्टिंग प्रणाली तयार केली असून, त्यांना ‘एंटरप्रेन्युअर एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ मिळाला आहे. श्रीधा ग्रीन सोल्युशन्स पर्यावरणपूरक आणि पुनर्वापरयोग्य खादी नॅपकिन्सचे उत्पादन करत आहे. सांटे फूड्स आरोग्यदायी डार्क चॉकलेट्स बनवते आणि ‘महा ६०’ कार्यक्रमांतर्गत त्यांची अव्वल ६० स्टार्टअप्समध्ये निवड झाली आहे. प्रॉक्सी फार्मा वनस्पती-आधारित पोषण उत्पादने विकसित करत असून, त्यांना राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एमआयटी-टीबीआयचे इन्क्युबेशन सेंटर सुमारे १२ हजार चौरस फूट जागेत उभारले आहे. येथे २७ हून अधिक मार्गदर्शक स्टार्टअप्सना मार्गदर्शन, धोरणात्मक सल्ला, निधी सहाय्य, पायाभूत सुविधा, नेटवर्किंग आणि उद्योग क्षेत्राशी संपर्क साधण्यासाठी मदत करतात. एमआयटी-टीबीआयने आतापर्यंत २० हून अधिक स्टार्टअप्सचे यशस्वी इन्क्युबेशन केले आहे. सध्या ७० हून अधिक स्टार्टअप्स या सेंटरशी जोडलेले आहेत, ज्यापैकी ३० हून अधिक प्रत्यक्ष तर ३५ हून अधिक दूरस्थ पद्धतीने कार्यरत आहेत. ईव्ही तंत्रज्ञान, स्वच्छ तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, अन्न तंत्रज्ञान, शिक्षण, वित्तीय तंत्रज्ञान आणि उत्पादन यांसारख्या क्षेत्रांतील नवकल्पनांना एमआयटी-टीबीआय सातत्याने पाठबळ देत असल्याचे प्रा. जोशी यांनी नमूद केले.
Source link
एमआयटी-टीबीआयने 20 हून अधिक यशस्वी स्टार्टअप्सना दिले बळ:दहा वर्षांपासून नवउद्योजकांना प्रोत्साहन, अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी