Headlines

पुणे गणेशोत्सवात प्लाझ्मा, लेझरवर पूर्ण बंदी:नियम मोडल्यास मंडळांवर कायदेशीर कारवाई होणार




पुणे जिल्ह्यातील आगामी गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये प्लाझ्मा आणि लेझरच्या वापरास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ध्वनी व प्रकाश प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन केले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिला. पोलीस अधीक्षक गिल यांनी गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपस्थित होते. गिल यांनी सांगितले की, पुणे ग्रामीण पोलिसांनी आगामी गणेशोत्सवासाठी व्यापक तयारी केली आहे. जिल्ह्यात पाच हजारांहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आणि सुमारे १ लाख ७० हजार घरगुती गणपतींची स्थापना केली जाते. उत्सवाच्या नियोजनासाठी १५० प्रमुख गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये मंडळांच्या प्रतिनिधींनी रस्त्यांची दुरुस्ती, सुरक्षित वीजपुरवठा, नदीपात्रातील पाण्याची वाढती पातळी आणि विसर्जन मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या यांसारख्या समस्या मांडल्या. यावर संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजना केल्या जातील, असे गिल यांनी आश्वासन दिले. भाविकांच्या सुरक्षेसाठी गणेश मंडळांनी आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलीस अधिकारीही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन उत्सवाचे नियोजन करत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात सामाजिक जनजागृतीवरही भर दिला जाणार आहे. प्रत्येक गणेश मंडळाने अमली पदार्थांविरोधातील ‘से नो टू ड्रग्स’ अभियानात सहभागी होऊन जनजागृतीपर प्रदर्शन आयोजित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महिला सुरक्षेबाबतही पोस्टर आणि अन्य माध्यमांतून जनजागृती केली जाईल. जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या मुलींवरील अत्याचार आणि खुनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सतर्कता आणि जनजागृती निर्माण करण्यावर भर दिला जाईल. सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीबाबतही गणेश मंडळांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार असल्याचे गिल यांनी स्पष्ट केले. याशिवाय, डीजेचा वापर ध्वनिप्रदूषण नियम आणि निर्धारित ध्वनिमर्यादेच्या अधीन राहूनच करावा लागेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पुणे ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *