![]()
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांच्या लूटमार प्रकरणात पोलिसांना पहिले यश मिळाले आहे. लासूर (ता. वैजापूर) टोलनाक्याजवळ भरदुपारी फॉर्च्युनर गाडी लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील एका दरोडेखोराला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी जेरबंद केले. उर्वरित दरोड्याच्या गुन्ह्यातील दरोडेखोरांचा पोलिस शोध घेत आहेत. गुरुवारी मध्यरात्री सिन्नर (जि. नाशिक) जवळच्या दुशिंगवाडी शिवारात दरोडेखोरांनी छत्रपती संभाजीनगरच्या एका कुटुंबासह हिंगोलीतील रुग्णाच्या गाडीला लक्ष्य केले होते. तर २६ ऑगस्ट रोजी दुपारी ४.१० ते ४.२० दरम्यान साहिल सतीश सोनवणे (२२, रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांच्या फॉर्च्युनरला लासूर टोलनाक्याजवळ रोखून आठ अनोळखी व्यक्तींनी मारहाण करून गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली होती. अन्य एका घटनेत राखीपौर्णिमेसाठी मुंबईला जाणाऱ्या ॲड. श्रीकांत मिश्रा यांच्या गाडीखाली रात्री ११.१५ वाजता रॉड फेकून टायर फोडण्यात आले. गाडी थांबताच १२ जणांच्या टोळक्याने मारहाण सुरू केली. दरोडेखोरांनी त्यांच्या पत्नीच्या कुशीतील १९ महिन्यांच्या ‘अवधूत’ला हिसकावले. ‘सोनं, पैसे घ्या पण लेकराला सोडू नका’ या आईच्या विनवणीनंतरही क्रूर दरोडेखोरांनी बाळाला सिमेंटच्या रस्त्यावर फेकले व अंगावरील दागिने ओरबाडले. तब्बल २५ मिनिटे हा थरार सुरू होता. यावेळी हजारो गाड्या गेल्या, मदतीला कुणीही थांबले नाही. रुग्णाच्या गाडीवरही हल्ला या घटनेनंतर तासाभरातच १२.४० च्या सुमारास हिंगोलीहून जखमी रुग्णाला केईएम रुग्णालयात (मुंबई) नेणाऱ्या एर्टिगा कारचे इंजिन रस्त्यावर वस्तू फेकून फोडण्यात आले. प्रवासी खाली उतरताच १० ते १५ जणांच्या टोळीने मारहाण करत १ लाखाचा ऐवज लुटला. हे दरोडेखोर शुद्ध मराठीत बोलत होते. रुग्णाचे हाल अन् एसपींचा दौरा लूटमारीनंतर शनिवारी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, एफआयआरसाठी रुग्णासह नातेवाइकांना पाच तास ताटकळत ठेवण्यात आले. मीडिया आल्यावरच जबाब नोंदवला. दरम्यान, पोलिस अधीक्षक डॉ. डी. स्वामी यांनी गाडीतून न उतरताच केवळ ५-७ मिनिटे अधिकाऱ्यांशी चर्चा करून घटनास्थळाची पाहणी उरकली. फॉर्च्युनरच्या बॅक कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद २६ ऑगस्टला लासूरजवळ साहिल सोनवणे यांची फॉर्च्युनर अडवून आठ जणांनी मारहाण करत दीड लाखांची सोनसाखळी लुटली होती. यातील एकाला तांत्रिक विश्लेषण व फॉर्च्युनरच्या बॅक कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे शनिवारी अटक करण्यात आली. त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून, इतर ७ आरोपींसाठी पाच पथके रवाना झाली आहेत.
Source link
समृद्धीवर लूटमार करणाऱ्या एका दरोडेखोराला पकडले:तीन घटना, 19 महिन्यांच्या चिमुकल्याला फेकले रस्त्यावर