![]()
लाडक्या गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच पैठण शहरासह ग्रामीण भागात गणेशमूर्ती घडवण्याच्या कामाला वेग आला आहे. बाप्पांच्या विविध आणि आकर्षक रूपांना आकार देण्यासाठी राजस्थानातील उदयपूर येथील कुशल मूर्तिकारांचे पथक पैठणमध्ये दाखल असून, सध्या दिवस-रात्र मूर्ती घडवण्याची आणि रंगवण्याची लगबग सुरू आहे. मात्र, यंदा रंग, कच्चा माल, सजावटीचे साहित्य, वाहतूक खर्च, मेहनताना वाढल्यामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत दहा टक्के वाढ झाली आहे. पैठणमध्ये राजस्थानच्या उदयपूर येथील देवीलाल पुजापत कुमार यांच्यासह अनेक कारागिरांनी गणेशमूर्ती तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. मातीला सुबक आकार देण्यापासून ते मूर्तीची बांधणी, रंगकाम, दागिने, मुकुट आणि अंतिम सजावट करण्यापर्यंतची कामे अत्यंत वेगाने सुरू आहेत. सध्या गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मूर्तिकारांकडून बाप्पांच्या रूपाला अंतिम स्पर्श देण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेतले जात आहेत. दरम्यान, यंदा नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जागरूकता दिसून येत आहे. विसर्जनानंतर पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या शाडू मातीच्या मूर्तींना ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. मूर्तीवर रंगरंगोटी करताना कारागीर. यंदाआकर्षक मुकुट, रेशमी वस्त्रे, नयनरम्य रंगसंगती आणि बारकाईने केलेली सुबक कलाकुसर यामुळे मूर्तींना तेज प्राप्त झाले आहे. गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध कच्च्या साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. रंग, माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, सजावटीचे साहित्य, वाहतूक खर्च तसेच कामगारांच्या वाढलेल्या रोजंदारीमुळे उत्पादन खर्चात मोठी भर पडली आहे. याचा थेट परिणाम मूर्तींच्या अंतिम विक्री दरावर झाला असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मूर्तींच्या किमती वाढवाव्या लागल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. घरगुती गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या छोट्या मूर्तींपासून ते सार्वजनिक गणेश मंडळांसाठीच्या भव्य मूर्तींपर्यंत विविध आकार बाजारात उपलब्ध करण्यात आले आहेत. पैठणमध्ये सध्या अर्ध्या फुटापासून तब्बल सात फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत. मूर्तीचा आकार, कलाकुसर, रंगसंगती, मुकुट, दागिने आणि सजावटीच्या थाटानुसार दर निश्चित केले जात आहेत. गणेशमूर्तींच्या किमती १०० ते १७ हजार रुपयांपर्यंत आहेत.
Source link
यंदा गणेशमूर्तींच्या दरात 10 टक्के वाढ:अर्ध्या ते 7 फुटांपर्यंतच्या मूर्ती तयार करण्यास राजस्थानचे कलाकार