Headlines

'भाजप उभी करण्यात नाथाभाऊंचे मोठे योगदान':शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचे कौतुक; अमृत महोत्सवाला मात्र भाजप नेत्यांची पाठ




राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथे आयोजित अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे भाजपच्या एकाही वरिष्ठ नेत्याने हजेरी न लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र शरद पवारांनी आपल्या भाषणात खडसेंच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष उभा करण्यात दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यासोबतच ‘नाथाभाऊ’ म्हणजेच एकनाथ खडसे यांचे अत्यंत मोलाचे योगदान असल्याचे सांगत पवारांनी त्यांच्या राजकीय संघर्षाला आणि भाजपच्या उभारणीतील त्यांच्या वाट्याला कृतज्ञतापूर्वक उजाळा दिला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, अनेक वर्षे या भागाची सेवा करण्याचे काम एकनाथ खडसे यांनी केले. या मतदारसंघाने त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेकवेळा निवडून दिले. 1967 ला मी देखील महाराष्ट्राच्या राजकारणात निवडून गेलो. विधानसभेच्या सभागृहात 2 माणसांची भाषणे कायम लक्षात राहिली, एक पाटील आणि दुसरे नाथाभाऊ. सभागृहात अतिशय प्रभावीपणे त्यांनी आपले मुद्दे मांडले, असे म्हणत शरद पवारांनी एकनाथ खडसे यांच्या कामाचे कौतुक केले. नाथाभाऊंचे भाजप उभा करण्यात मोठे योगदान पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मंत्रिमंडळात गेल्यानंतर 12 खाती सांभाळणारा एकमेव मंत्री नाथाभाऊ होते. भाजपमध्ये त्यांनी काम केले, भाजप उभा कोणी केला असेल तर नाथाभाऊ आणि प्रमोद महाजन यांचे नाव घ्यावे लागेल, असे सांगत पवारांनी खडसेंच्या भाजप पक्षाच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाविषयी सांगितले. नाथाभाऊंना विधानसभेत कोणालाही थांबवता येत नसायचे- जयंत पाटील दरम्यान, जयंत पाटील यांनी देखील एकनाथ खडसे यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, नाथाभाऊ विधीमंडळात त्यांच्या प्रवेशापासून आम्ही त्यांची राजकीय कारकिर्द जवळून पाहिली आहे, त्या काळात त्यांचा पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी अविरत मेहनत घेतली. नाथाभाऊंना विधानसभेत कोणालाही थांबवता येत नसायचे, त्यांचा आवाज असा होता, की समोरच्याला बोलता येत नसे, विधानसभेत आल्यावर सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम कसे करायचे हे त्यांच्यापासून शिकायला मिळाले, असे पाटील यांनी सांगितले. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा मुक्ताईनगरात खडसेंचा अमृत महोत्सव:शरद पवारांनी मला अंधारातून उजेडात आणले- एकनाथ खडसे, नाथाभाऊंनी भाजप वाढवण्यासाठी मेहनत घेतली- जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सवी सोहळा मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी राजकीय प्रवासातील जुन्या आठवणींना उजळा दिला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *