![]()
बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकल्या गोविंदाने सातव्या थरावर चढून सलामी दिली आणि इतक्यात सेफ्टी बेल्ट तुटून तो थेट खाली कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. बदलापूर येथे आयोजित करण्यात आलेलेल्या माखन चोर दहीकाला उत्सवात हा प्रसंग घडला. माखन चोर प्रतिष्ठानची मंडळी चोर हंडी फोडण्यासाठी आले असताना त्यांनी सात थर रचले आणि नेमके सातव्या थरावरून चिमुकल्या गोविदाने सलामी दिली आणि हांडी फोडणार इतक्यात तो खाली कोसळला. हे दृश्य पाहताना उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. या दहीहांडी उत्सवात अचानक असा प्रसंग घडल्याने तिथे उपस्थित प्रेक्षक तसेच गोविंदांमध्ये काही काळासाठी एकच खळबळ उडाली होती. दहीहंडी उत्सवात उंच थर रचताना गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्टसह विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र, सातव्या थरावर असताना चिमुकल्याचा सेफ्टी बेल्ट तुटल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच सेफ्टी बेल्ट अचानक कसकाय तुटला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या आयोजकांकडून हा प्रकार कसा घडला, याची चौकशी केली जात आहे. दरम्यान, दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला जातो. मुंबईत विविध ठिकाणी उंच थरांचा विक्रमही केला जातो. त्यावर लाखोंचे बक्षीसही ठेवले जाते. मात्र, गोविंदांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना नसतील तर चिमुकल्या गोविंदांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो, अशी भीती अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. यंदाची दहीहंडी 5 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. मुंबईसह ठाण्यात विविध राजकीय नेत्यांकडून लाखों रुपयांचे बक्षीस असलेली दहीहंडी उत्सव आयोजित केली जातात. मात्र, या दहीहंडी अत्यंत उंचावर असल्याने गोविंदा पथकांना नऊ ते दहा थर लावावे लागतात. या प्रयत्नात दरवर्षी दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा जखमी होतात. त्यात आता बदलापूरमध्ये सेफ्टी बेल्टच तुटल्याने गोविंदाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Source link
सातव्या थरावरून चिमुकला गोविंदा थेट खाली कोसळला:सेफ्टी बेल्ट तुटल्याने घडली घटना, बदलापूरच्या दहीहंडीत मोठा अनर्थ टळला