![]()
उपराजधानी नागपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, शहरातील तब्बल १८ नामांकित शाळा आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून आज या सर्व शाळांना अचानक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. धमकीच्या ई-मेलमध्ये काय होते? १९ ऑगस्ट रोजी नागपुरातील या १८ शाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला एक संशयास्पद ई-मेल आला होता. या ई-मेलद्वारे संबंधित इमारती बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, या धमकीमध्ये ‘३१ ऑगस्ट’ या तारखेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. आज तीच तारीख असल्याने कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने तत्काळ विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि पोलिसांची कारवाई या गंभीर प्रकाराची पोलिसांनी तातडीने दखल घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान, हा संशयास्पद ई-मेल फ्रान्स आणि बांगलादेश या देशांमधून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ई-मेल प्राप्त होताच बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सर्व शाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराची कसून तपासणी केली होती. सुदैवाने, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. कडक पोलिस बंदोबस्त तैनात ई-मेलमध्ये नमूद केलेली ३१ ऑगस्ट ही तारीख आज असल्याने नागपूर पोलीस सध्या पूर्णपणे ‘अलर्ट मोड’वर आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव कोणतीही जोखीम न पत्करता सर्व १८ शाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी आणि पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच घाबरून जाऊ नये, असे आवाहन नागपूर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हेही वाचा.. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस: प्रकृती खालावली तरी उपचार नाकारले; सरकारचे शिष्टमंडळ आज पुन्हा भेट घेण्याची शक्यता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील 11व्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सलग उपोषणामुळे जरांगे पाटील यांची शुगर काही प्रमाणात खालावली असली, तरी त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. दरम्यान, रविवारी परभणीत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागली. सविस्तर वाचा
Source link
नागपुरातील 18 नामांकित शाळांना अचानक सुटी:बॉम्बच्या धमकीने उडाली खळबळ, अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त