Headlines

पिकांची नुकसान भरपाई मिळणार:एकल महिलांना कर्ज अन् प्रोत्साहन निधीत वाढ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ठराव, शासनाकडे करणार पाठपुरावा‎




सप्टेंबर उजाडला तरी पुरेशा पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतीपिके सुकत आहेत. ती नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. अशा अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांची बँक म्हणून त्यांच्या पाठिशी उभे राहणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे शासनाने शेतीपिकांची नुकसानभरपाई द्यावी, असा ठराव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केला आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (एडीसीसी) आमसभा आज, मंगळवारी येथील सांस्कृतिक भवनात पार पडली. यावेळी संचालक सुरेखाताई ठाकरे यांनी या ठरावाची मांडणी केली. उपस्थित सर्वांनी त्याला अनुमोदन दिले. याशिवाय एकल महिलांना कर्जाची उपलब्धता, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन निधीत वाढ आदी ठरावही आजच्या आमसभेने पारित केले. हे सर्व ठराव खुद्द अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनीच मांडले होते. दरम्यान, पारित झालेले सर्व ठराव शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे. नेहमी सत्ताधारी आणि विरोधक असा सामना रंगवणाऱ्या आजच्या सभेतही वादावादीचे वातावरण दिसून येईल, असे सर्वांना वाटत होते. परंतु तसे काहीही झाले नाही. उलट विरोधकांच्या तंबूतील काही संचालक थेट मंचावरच उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल यांनी प्रशासकीय मांडणी केली. त्यानंतर बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी धावता आढावा घेतला. शेवटी अध्यक्ष या नात्याने आमदार बच्चू कडू यांनी सर्वंकष माहिती दिली. भविष्यात ही बँक पश्चिम महाराष्ट्रातील प्रगत बँकांच्याही एक पाऊल पुढे असेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. नवीन योजनांचे सूतोवाच बँकेच्या भागधारक असलेल्या जिल्हाभरातील सेवा सहकारी सोसायट्यांसाठी जिल्ह्याच्याठिकाणी एक संयुक्त भवन उभे केले जाणार आहे. महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने काही योजना सुरू करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. मंचावर इतर संचालक माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे, सुनील वऱ्हाडे, रवींद्र गायगोले, हरिभाऊ मोहोड, चित्राताई डहाणे, जयप्रकाश पटेल, दयाराम काळे, आनंद काळे, अजय मेहकरे आदी उपस्थित होते. निवडणुकीचे वेध देणारी शेवटची आमसभा; काही मुद्दे न्यायप्रविष्ट आजची आमसभा ही एडीसीसीची शेवटची आमसभा होती. पुढच्या महिन्यात बँकेच्या संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या आमसभेत आगामी निवडणुकीचाही बिगुल फुंकण्यात आला. तशी तयारी सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाने सुरू केली आहे. परंतु सत्ताधारी आणि विरोधकांमधील काही मुद्दे न्यायप्रविष्ट असल्याने निवडणूक लांबते की काय, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *