Headlines

Sanjay Raut Attacks Eknath Shinde Over Shiv Sena Symbol Controversy


शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज शिंदे गटाच्या वतीने युक्तिवादाला सुरुवात होत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून कपिल स

.

‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी करणे दुर्दैवी असल्याचे एकनाथ शिंदे सांगत आहेत. मात्र, हे चिन्ह गोठवण्याची वेळच कोणी आणली, असा सवाल करत राऊत यांनी शिंदे गटावर तीव्र शब्दांत टीका केली. या संपूर्ण प्रकरणात सत्य आणि संविधानाचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी आधीचे निर्णय खोडून काढले’

संजय राऊत म्हणाले की, गेल्या 7 ते 8 दिवसांपासून कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी अत्यंत प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यांच्या मते, या युक्तिवादातून आधीच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आणि राज्यपालांच्या निर्णयावर गंभीर कायदेशीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आता शिंदे गटाकडूनही त्यांचे वकील युक्तिवाद करतील. त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मोठमोठे वकील न्यायालयात उभे राहतील, त्यांचे म्हणणे ऐकले जाईल. मात्र हे प्रकरण घटनापीठासमोर असल्याने अंतिम निर्णय संविधानाच्या चौकटीतच होईल, असे राऊत यांनी सांगितले. सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणाचा निकाल लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निकाल कोणत्याही दबावाखाली न येता कायदा आणि संविधानाच्या आधारे लागेल, असा विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटले.

ऐतिहासिक आणि स्वच्छ निर्णयाची अपेक्षा

या प्रकरणाचा निकाल केवळ शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हापुरता मर्यादित राहणार नाही, असे राऊत म्हणाले. देशाच्या राजकारणासाठी आणि भविष्यातील पक्षांतराच्या घटनांसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरेल. पक्षांतराला आळा घालण्यासाठी या निकालातून स्पष्ट दिशा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून देशाला ऐतिहासिक आणि स्वच्छ निर्णय मिळेल, असा दावा राऊत यांनी केला.

शिंदे वारंवार दिल्लीला का जातात?

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरही प्रश्न उपस्थित केले. राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना उपमुख्यमंत्री वारंवार दिल्लीला का जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. राज्यात लोक रस्त्यावर आहेत, आदिवासींचे प्रश्न आहेत आणि मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एक आंदोलनाचे आव्हान उभे केले आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार दिल्ली किंवा इतर ठिकाणी जाण्याऐवजी राज्यातील प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा टोला राऊत यांनी लगावला.

शिंदे स्वतः न्यायालयात उपस्थित राहणार आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतरही राऊत यांनी त्यांच्या दिल्लीतील उपस्थितीवरून टीका केली. मात्र न्यायालयात कोण उपस्थित आहे यापेक्षा न्यायालयाचा निर्णय काय येतो, हे महत्त्वाचे आहे. सत्याच्या बाजूने निकाल लागेल आणि संविधानाचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चोरांनी धनुष्यबाण चोरला, आधी मुद्देमाल जप्त करा

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला थेट ‘चोर’ संबोधत म्हटले, “धनुष्यबाण गोठवण्याची वेळ कुणामुळे आली? या चोरांनीच ते चोरले आणि लुटले. अमित शहा या डाकूंच्या मदतीने भारतीय जनता पक्षातल्या सरदारांनी बाळासाहेब ठाकरेंचा पवित्र धनुष्यबाण चोरला आणि आता ते त्याच्या आधारावर निवडणुका लढत आहेत. शिंदेंना कायदा कळतो का? कायदा विकत घेता येत असला तरी तो समजावा लागतो. कायद्यानुसार, आधी मुद्देमाल (पक्ष आणि चिन्ह) जप्त करावा लागतो आणि त्यानंतर त्यावर निर्णय होतो.” “या सगळ्या प्रकाराची एकनाथ शिंदेंना जेव्हा जाणीव होईल, तेव्हा त्यांना आयुष्यभर स्वतःचीच लाज वाटेल,” असा घणाघात राऊत यांनी केला.

पक्षांतराची बाजू भक्कम कशी असू शकते?

एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत असून ते सुनावणीदरम्यान न्यायालयात उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर राऊत म्हणाले, “ते दिल्लीत आहेत, कोर्टातही जातील, पण त्यांना वाटते की त्यांची बाजू भक्कम आहे. पक्षांतर करणाऱ्यांची बाजू कशी काय भक्कम असू शकते? हा केवळ पैशांचा खेळ आहे.”

“एकनाथ शिंदे न्यायालयात जाऊन काय सौदा करू इच्छितात? नव्या डिक्शनरीत ‘सौदा’ शब्दाला ‘शिंदे’ आणि ‘मिंधे’ हेच पर्यायी शब्द येतील. आम्हाला पूर्ण खात्री आहे की, घटनापीठ कोणत्याही दबावाला बळी न पडता ऐतिहासिक आणि स्वच्छ निकाल देईल, ज्यामुळे भविष्यात पक्षांतराला आळा बसेल.”

संजय राऊत पुढे म्हणाले- “अमित शहा हे डाकू आहेत. आणि शिंद्यांनी डाकूंच्या मदतीनेच पक्ष-चिन्ह चोरलंय. म्हणूनच ते गोठवण्याची वेळ शिंदेंमुळेच आली आहे. पक्षांतर करणाऱ्यांची बाजू भक्कम असूच शकत नाही.”

छत्रपती शिवरायांच्या शेजारी मोदी नकोच; अमित ठाकरेंची भूमिका योग्य

पुण्यातील एका महाविद्यालयातून मनसे नेते अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी लावलेला पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी राऊत यांनी अमित ठाकरेंची पाठराखण केली. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो नको, एवढीच अमित ठाकरेंची भूमिका होती आणि ती १००% योग्य आहे. हा महाराष्ट्राच्या मनातला उद्रेक आणि संताप आहे.”

“सरकारी कार्यालयांमध्ये शिष्टाचार म्हणून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे फोटो असतात. पण खोटी आणि असत्य बोलणारी, महाराष्ट्राच्या पाठीत रोज खंजीर खुपसणारी व्यक्ती हिंदवी स्वराज्य संस्थापकाच्या शेजारी नको, हेच खरे आहे. महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो लावणे हा शिवरायांचा अपमान आहे.”

होय, मुंबई ठाकरेंच्याच बापाची आहे!

भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी “मुंबई काय ठाकरेंच्या बापाची आहे का?” असा सवाल केल्यावर राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले. “होय, मुंबई ठाकरेंच्या बापाचीच आहे! आणि तुम्ही तो सातबारा कोरा करू शकणार नाही. ती काही अडाणी किंवा लोढा यांच्या बापाची नाही. हे बिनबापाचे लोक आहेत, ज्यांना दुसऱ्यांच्या बापाबद्दल खुमखुमी असते. आमचा बाप मजबूत आहे.”

स्वतः सोन्याचा चष्मा घालतात आणि आम्हाला सोनं घेऊ नका म्हणतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला परदेशात जाऊ नका आणि सोने घेऊ नका, असे आवाहन केले होते. यावरून राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला. “जे स्वतः परदेशात (किर्गिस्तान, उझबेकिस्तान) फिरून भाषणे देतात, ज्यांच्या पोटाची बटणे सोन्याची आहेत, पेन सोन्याचा आहे आणि जे सोन्याच्या काडीचा चष्मा घालतात, तेच आम्हाला सोनं वापरू नका असा उपदेश करत आहेत. यावर काय बोलायचे?” असा टोला त्यांनी लगावला.

निवडणूक आयोगावर राहुल गांधींच्या आरोपांचे समर्थन

निवडणूक आयोगावरील काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांबाबतही राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाबाबत केलेले आरोप योग्य असल्याचे सांगितले. मतदार यादी, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निवडणूक आयोगाची भूमिका या मुद्द्यांवर विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या भूमिकेचे राऊत यांनी समर्थन केले. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकारणात सध्या शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा वाद, स्थानिक पातळीवरील भाजप-मनसे संघर्ष आणि मराठवाड्यातील आंदोलनाची तयारी असे अनेक मुद्दे चर्चेत आहेत. मात्र आज सर्वोच्च न्यायालयात सुरू होणाऱ्या शिंदे गटाच्या युक्तिवादामुळे शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरण पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

हेही वाचा…

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर आजपासून शिंदे गटाचा युक्तिवाद: ‘धनुष्यबाण’ गोठवण्याच्या मागणीवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या हक्कावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आज, 2 सप्टेंबर रोजी दुपारी 2 नंतर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. या खटल्यात आतापर्यंत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. विशेष म्हणजे, ठाकरे गटाकडून ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे. आजपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या वतीने मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल हे ज्येष्ठ वकील आपला युक्तिवाद मांडणार आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.