![]()
पुणे शहरातील जुन्या निवासी इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी ‘रीडेव्हलपमेंट गुरु’ ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित व्हॉट्सॲप सेवा सुरू करण्यात आली आहे. ड्रीम्स रीडेव्हलपमेंटचे संस्थापक सीए एस लक्ष्मीनारायण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही सेवा गृहनिर्माण संस्थांचे सभासद आणि विकासक यांच्यात दुवा म्हणून काम करेल, ज्यामुळे पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होईल. लक्ष्मीनारायण यांनी सांगितले की, पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सभासदांना अनेकदा कागदपत्रे, विकासकाची निवड, कराराचा मसुदा, आर्थिक व्यवहार, वास्तुविशारद आणि कायदेशीर बाबींची पुरेशी माहिती नसते. यामुळे निर्णय घेण्यास उशीर होतो आणि सभासदांच्या मनात अनेक शंका निर्माण होतात. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे ही डिजिटल सेवा तयार करण्यात आली आहे. या सेवेने आतापर्यंत सुमारे ४०० गृहनिर्माण संस्थांसोबत काम केले आहे. तसेच, ११२ विकासकांच्या माध्यमातून सुमारे १ हजार ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित पुनर्विकास प्रकल्पांमध्ये मार्गदर्शन केले आहे. या अनुभवातूनच सभासदांना एकाच ठिकाणी सोपी, अचूक आणि सहज समजणारी माहिती देण्याची गरज लक्षात आली, त्यातूनच ‘रीडेव्हलपमेंट गुरु’ची निर्मिती झाली. पुनर्विकास प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सुमारे ७५ टक्के व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असतात. त्यांची आयुष्यभराची कमाई आणि घराच्या रूपातील भांडवल या प्रक्रियेशी जोडलेले असते. त्यामुळे विश्वासार्हता, आर्थिक सुरक्षितता आणि व्यवहारातील पारदर्शकता खूप महत्त्वाची ठरते. चुकीचा निर्णय झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शनाची गरज असते. या सेवेद्वारे पुनर्विकासासंबंधी कायदे, सरकारी नियम, आवश्यक कागदपत्रे, विकासक निवडीची पद्धत, करारातील महत्त्वाच्या तरतुदी, वास्तुविशारदांची भूमिका आणि सर्वसाधारण सभेची प्रक्रिया याबाबत माहिती दिली जाईल. व्हॉट्सॲपवर ‘गुरु’ असा संदेश पाठवल्यानंतर सभासदांना त्यांच्या प्रश्नांची मोफत उत्तरे मिळतील. भविष्यात ही सेवा स्वतंत्र वेब आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून राज्यभर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
Source link
पुनर्विकासासाठी 'रीडेव्हलपमेंट गुरु' व्हॉट्सॲप सेवा सुरू:एआयच्या मदतीने किचकट प्रक्रिया सोपी होणार, सभासदांना मिळेल अचूक माहिती