![]()
सहा वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपीला ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज, बुधवार २ सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा अंतिम निर्णय जाहीर झाला. किशोर श्रीकिसन लडके (राहणार भातकुली रेणुकापुर, ता. धामणगाव रेल्वे) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २८ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भातकुली रेणुकापुर येथे घडली होती. ६ वर्षांची पीडित मुलगी तिच्या घरासमोर खेळत असताना आरोपी किशोर लडके याने तिला ‘तू माझ्यासोबत घरी चल, मी तुला गाठी देतो’ असे आमिष दाखवून स्वतःच्या गोठ्यात नेले आणि तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पीडितेच्या आईने तिला हाक मारल्याने आरोपीने मुलीला सोडले. त्यानंतर पीडितेने पळत जाऊन घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. पीडितेच्या माहितीवरुन तिच्या आईने मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रस्तुत प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक प्रनिल पाटील यांनी संपूर्ण व सखोल तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय कोर्ट क्रमांक २ चे न्यायाधीश यशवंत आनंद गोस्वामी यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यांची बयाणे व कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे भा.दं.वि.कलम ३५४-ब अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. रणजित नाशिककांत भेटाळू यांनी सरकार पक्षातर्फे यशस्वी युक्तिवाद केला, तर कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल रोशन दुधे यांनी मदत केली.
Source link
शिक्षा:65 वर्षांच्या वृद्धाला तीन वर्षांचा सश्रम कारावास चिमुकलीवर केला होता लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न