Headlines

भाववाढ आणि टंचाईमुळे साखरेला ‘स्टॉक लिमीट’ लागू:साठेबाजांवर अंकुश, तपासणी सुरु झाल्याने पीडीएसची डोकेदुखी वाढली




अमरावती जिल्ह्यात वाढती महागाई आणि साखरेच्या कमी पुरवठ्यामुळे ‘स्टॉक लिमीट’ (साठेबाजीवर अंकुश) लागू करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची कामे वाढली असून, ठोक विक्रेत्यांकडील साठा दररोज मोजला जात आहे. शासनाच्या नवीन आदेशानुसार, प्रत्येक ठोक विक्रेत्याला एका महिन्यात ४ हजार क्विंटल साखरेची विक्री करण्याची मुभा आहे. यापेक्षा जास्त साठा आढळल्यास संबंधितांवर १९५५ च्या जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार कारवाई केली जाईल. या सरकारी हस्तक्षेपामुळे साखर बाजारातील अनिश्चितता दूर होऊन सामान्य ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात साखरेची टंचाई जाणवत होती. यामुळे साखरेचे भाव अचानक वाढले होते आणि नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागत होते. या वाढत्या किमतींमुळे सरकारवर चौफेर टीकाही होत होती. सणासुदीच्या दिवसांत अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारची कोंडी झाली होती. त्यामुळेच साठेबाजीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाचे म्हणणे आहे की, साठेबाजीला आळा बसल्यामुळे बाजारात साखरेचा पुरवठा सुरळीत होईल आणि सणासुदीच्या काळात साखरेचे भाव नियंत्रणात राहण्यास मदत होईल. ‘स्टॉक लिमीट’च्या या निर्णयामुळे जास्त नफा मिळवण्यासाठी काही व्यापाऱ्यांकडून होणारी साखरेची साठेबाजी थांबेल. यामुळे किरकोळ बाजारात साखरेचा तुटवडा जाणवणार नाही. तसेच, बाजारातील कृत्रिम टंचाई दूर होऊन किमती नियंत्रणात येण्यास मदत होईल. याच उद्देशाने जिल्हा मुख्यालयातील घाऊक विक्रेत्यांवर दररोज बारीक नजर ठेवली जात आहे. त्यांच्याकडील साठा आणि रोजची आवक-जावक याची मोजणी केली जात आहे. यासाठी अन्न धान्य वितरण विभाग आणि ठोक विक्रेते या दोघांनाही जास्त काम करावे लागत आहे. शहरात एकूण सात मोठे साठेबाज (स्टॉकीस्ट) आहेत. साखरेचा साठा आणि रोजची आवक-जावक याची नोंद ‘फूड स्टॉक मॉनिटरिंग पोर्टल’वर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबद्दलच्या सूचना सर्व स्थानिक साठेबाजांना देण्यात आल्या आहेत. शहरात डी-मार्ट (बियाणी चौक आणि बडनेरा रोड), भोजवानी ट्रेडर्स (इतवारा बाजार, वलगाव रोड), सक्करसाथमधील गंगाबकस, शिवसहाय खंडेलवाल, एस. एस. ट्रेडर्स आणि बद्रीनारायण खंडेलवाल, तसेच बडनेरा रोडवरील फ्लिपकार्ट हे प्रमुख साठेबाज आहेत. पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी जास्त काम करावे लागत असल्याने त्यांच्यात काहीशी अस्वस्थता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *