Headlines

सातारा जिल्ह्यात शाळा आणि आरोग्य केंद्रांचा होणार कायापालट:विकासकामांना गती देण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचे निर्देश




शाळांच्या भौतिक सुविधांपासून प्राथमिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणापर्यंत सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली असून, तब्बल ३२४ कोटी रुपयांच्या निधीतून २०९ प्राथमिक शाळा आणि २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्यात येणार आहे. या कामांना आता अधिक वेग देऊन निर्धारित कालमर्यादेत ती पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘माझी शाळा, आदर्श शाळा’ आणि ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात यांच्यासह गटविकास अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, पहिल्या टप्प्यात २५ केंद्रांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी ११४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेची गुणवत्ता आणि कार्यक्षमतेत सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार आहे. दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहावेत, यासाठी त्यांच्या निवासस्थानांचा प्रश्नही सोडविला जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र सात कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुसरीकडे, जिल्ह्यातील २०९ प्राथमिक शाळांसाठी २१० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या शाळांमध्ये आधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वातावरण देण्याचा प्रयत्न आहे. सन २०२६-२७ मध्ये या कामांपैकी ९० टक्के कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, उर्वरित कामांनाही गती देण्याच्या सूचना देसाई यांनी दिल्या. बैठकीऐवजी प्रत्यक्ष पाहणीवर भर कामांची प्रगती केवळ कागदोपत्री बैठका घेऊन तपासू नये, तर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळा आणि आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पाहणी करावी, असे देसाई यांनी स्पष्ट केले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दर पंधरा दिवसांनी कामांचा आढावा घ्यावा, तर पूर्ण झालेल्या आदर्श शाळांची गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, असेही निर्देश देण्यात आले. शाळा आणि आरोग्य केंद्रांना सौरऊर्जेची जोड देण्यावरही प्रशासनाने भर द्यावा. वीजपुरवठ्यातील अडथळ्यांमुळे सेवा प्रभावित होऊ नयेत, हा त्यामागील उद्देश आहे. प्रत्येक नगरपरिषद हद्दीत दरवर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून एक शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याची सूचनाही करण्यात आली. रुपनवर प्रकरणाचा समांतर तपास डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्या प्रकरणावर बोलताना देसाई यांनी दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले. पोलिसांकडून समांतर तपास सुरू असून, फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक लीला मदने यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशी समितीचा अहवाल गांभीर्याने घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल. या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेखर गोरे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाचे स्वागत करताना सातारा जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देसाई म्हणाले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत मात्र त्यांनी सावध भूमिका घेतली. भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या महायुतीबाबतच्या वक्तव्याची माहिती नसल्याचे सांगत, संबंधित निर्णय वरिष्ठांशी चर्चा करून घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *